कल्याण दि.19 एप्रिल :
भारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत सुरत येथे आयोजित इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड स्पर्धा 2020 मध्ये (ISAC) केडीएमसीला जाहीर झालेला राष्ट्रीय स्तरावरील कोवीड ईनोवेशनचा प्रथम पुरस्कार केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री हरदीप पुरी यांचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला. सुरतमध्ये स्मार्ट सिटी- स्मार्ट अर्बनायजेशन (smart City smart urbnaisation) च्या 3 दिवसीय परिषद संपन्न झाली.
त्यावेळी कोवीड काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल केडीएमसीला नुकताच जाहीर झालेला covid-19 इनोव्हेशन अवॉर्ड प्रदान करण्यात आला. हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार इनोवेशन इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी प्रामुख्याने महापालिकेस प्राप्त झाला आहे. महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि एसकेडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे यांनी तो स्वीकारला. त्याचसोबत फ्रीडम टू वॉक या स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये महापालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांना प्राप्त झालेला प्रथम पुरस्कार भागवत यांच्या वतीने महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांनी यावेळी स्वीकारला.
संकटांचे संधीमध्ये कसे रूपांतर करावं याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा पुरस्कार – आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी
आपल्यावर उद्भवलेल्या संकटांचे एका संधीमध्ये कसे रूपांतर करावं याचे उत्तम उदाहरण म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला राष्ट्रीय पातळीवर मिळालेला हा कोविड इनोव्हेशन पुरस्कार असल्याची भावना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
जेव्हा कोविडचे संकट आले तेव्हा महापालिकेकडे अत्यंत अपुरे इंफ्रास्ट्रक्चर होते. महापालिकेची दोन रुग्णालये आणि केवळ 40 टक्के मनुष्यबळाची उपलब्धता यावर या संकटाचा सामना करणे सर्वथा अशक्य होते. त्यामुळे आम्ही कल्याण-डोंबिवली इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा, कॅम्पा आणि इतर डॉक्टर संघटनांशी संपर्क साधून डॉक्टर आर्मी तयार केली. यामध्ये सुमारे 300 डॉक्टरांचा सहभाग होता.
महापालिकेच्या हॉस्पिटलमधील तुटपुंजी व्यवस्था पाहता, महापालिकेने 3 खाजगी रुग्णालयांशी सामंजस्य करार करून त्यांच्यामार्फत शेकडो कोविड रुग्णांना मोफत उपचार दिला. डॉक्टर्स आर्मीमधील डॉक्टरांनी या बिकट काळात महापालिकेचे तापाचे दवाखाने/ नागरी आरोग्य केंद्र, महापालिकेचे रुग्णालये चालविण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले, याच काळात आम्ही फॅमिली डॉक्टर कोविड फायटर ही अभिनव संकल्पना कल्याण-डोंबिवलीत राबविली. त्यामध्ये डॉक्टरांचे क्लस्टर तयार करून रुग्णांना उपचार देण्यात आले, म्हणूनच कोरोना रूग्णांना उपचार मिळणे सहज सुलभ झाले आणि कोविडच्या प्रारंभापासूनच महापालिकेचा मृत्युदर दोन टक्केपेक्षा कमी राहण्यास मदत झाल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्या समयी दिली.
महानगरपालिकेने पहिला covid-19 डॅशबोर्ड तयार केला. कोविडमधिल संचार बंदीच्या काळात आपले मंडी हे ॲपही तयार करून नागरिकांना फळ, अन्नधान्याचा पुरवठा केला. वृद्ध, अपंग नागरिकांना घरपोच अन्नधान्य आणि इतर सहाय्याची व्यवस्था महापालिकेमार्फत, स्वयंसेवकामार्फत उपलब्ध करून दिली. त्यामुळे रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात असूनही covid-19 वर नियंत्रण राखण्यास महापालिकेस यश प्राप्त झाल्याची माहितीही डॉ. विजय सुर्यवंशी यांनी यावेळी दिली.
यावेळी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, सिटी इंजिनियर सपना कोळी – देवनपल्ली, एसकेडीसीएलचे सीईओ प्रल्हाद रोडे, जनरल मॅनेजर प्रशांत भगत उपस्थित होते.