
निमा आणि निमा वुमेन्स फोरम कल्याण भूषविणार यजमानपद
कल्याण दि.25 सप्टेंबर :
आयएसएम (इंडीयन सिस्टीम ऑफ मेडीसीन) पदवीधरांची भारतातील सर्वात मोठी संस्था असलेल्या “निमा” म्हणजेच नॅशनल इंटीग्रेटेड मेडीकल असोसिएशनतर्फे कल्याणात “निमा वेदा ग्लॅम सौंदर्यस्पर्धा” आणि “आनंदी” राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमांचे कल्याणला प्रथमच यजमानपद मिळाले असून निमा आणि वुमेन्स फोरम निमा कल्याणतर्फे त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. निमा वुमेन्स फोरम कल्याणच्या प्रमुख डॉक्टरांकडून एका पत्रकार परिषदेत या कार्यक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.
येत्या शनिवारी म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी कल्याण पश्चिमेतील महाराजा बँक्वेट हॉलमध्ये ही निमा वेदा ग्लॅम सौंदर्यस्पर्धा” होणार असून त्यामध्ये निमा संघटनेच्या देशभरातील महिला डॉक्टर सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्रासह पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक आदी राज्यांतील 35 महिला डॉक्टर सौंदर्यवतींचा समावेश असल्याची माहिती या स्पर्धेच्या आयोजन समितीच्या चेअरमन डॉ. अमिता कुकडे यांनी दिली. ही केवळ सौंदर्य स्पर्धा नसून त्यामध्ये सहभागी स्पर्धकांच्या टॅलेंटचाही कस लागणार आहे. तर सध्या डॉक्टरांचे जीवन हे अतिशय तणावाचे बनले असून त्यांना विरंगुळ्याचे दोन क्षण अनुभवता यावे आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे हा या सौंदर्य स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे ऑर्गनायजिंग सेक्रेटरी डॉ. प्राजक्ता ठाकूर यांनी यावेळी सांगितले. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या प्रमूख उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होणार आहे.
तर या सौंदर्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 29 सप्टेंबर रोजी निमा संघटनेची “आनंदी” ही दुसरी राष्ट्रीय परिषद संपन्न होणार आहे. देशातील पहिल्या महिला डॉक्टर असलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी यांना या परिषदेच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात येणार असल्याची माहिती परिषद आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ. स्वप्ना जगदाळे यांनी यावेळी दिली. तसेच या परिषदेमध्ये निमा संघटनेचे देशभरातील 600 डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. 9 विविध विषयांवर या परिषदेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. आशुतोष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थितीत होणाऱ्या या परिषदेला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे हे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच वैद्यकीय क्षेत्र तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन महिला डॉक्टरांना या परिषदेमध्ये डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेला निमा कल्याण संघटनेच्या डॉ. स्वाती काळे, डॉ. रोहिणी वाळूंजकर यांच्यासह डॉ. शाम पोटदुखे आणि संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.