भिवंडी लोकसभेतील महा विकासआघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांची कल्याणात प्रचारसभा
कल्याण दि.12 मे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाऊले ही हुकूमशाहीकडे जाणारी असल्याचा घणाघात करत आपल्या सर्वांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या प्रवृत्तीचा पराभव करणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कल्याणात व्यक्त केले. भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण मैदानात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरू आणि गांधी घराण्याने देशासाठी दिलेले योगदान कोणी नाकारू शकत नाही. राजीव गांधी यांची हत्या झाली, इंदिरा गांधी जगाला भारताची ताकद दाखवून देणाऱ्या इंदिरा गांधींची हत्या झाली, देशात आधुनिकीकरणाची सुरुवात करणाऱ्या राजीव गांधी यांची हत्या झाली. गांधी – नेहरू कुटुंबाचे देशासाठी खूप मोठे योगदान आहे. त्यांचे हे योगदान, कर्तुत्व मान्य करून त्याचा सन्मान करण्याऐवजी राहुल गांधी आणि त्यांच्याकडून काढल्या गेलेल्या पदयात्रेची नरेंद्र मोदी त्यांची टिंगल टवाळी करत असल्याबद्दलही यावेळी शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
नरेंद्र मोदी यांचा लोकशाहीवर किती विश्वास आहे याची अनेक उदाहरणे देता येतील आहेत. संजय राऊत, अनिल देशमुख, झारखंड मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोदी सरकारने केवळ टिका केली म्हणून जेलमध्ये टाकले. यावरून त्यांचा लोकशाहीवर किती विश्वास आहे अशा शब्दांत पवार यांनी या राजकीय नेत्यांच्या अटकेचा समाचार घेतला. तसेच देशामध्ये आज रोजगार, सुरक्षा, भारत चीन सीमावाद असे अनेक गंभीर प्रश्न असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यावर बोलण्यासाठी वेळ नसल्याचे सांगत येत्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना आपली जागा दाखवायचे आवाहन शरद पवार यांनी आपल्या भाषणात केले.
रामाला पुढे करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न – जयंत पाटील
तर रामाला पुढे करून काही लोक निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत असल्याची टिका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केली. तसेच केंद्रातील सरकारने देशातील श्रीमंत उद्योगांना फायदा करून देण्यासाठी बँकांनी मोठमोठ्या कंपन्या स्वस्तात उद्योगपतींना विकत दिल्याने बँकांमध्ये खड्डा पडला आहे.
त्यामुळेच या बँकांकडून दरवर्षी 63 हजार कोटी भारतीयांच्या खात्यातून काढेल जात असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला. तर मोदी सरकारने श्रीमंत वर्गाला फार मोठी सवलत करून दिली असून या सरकारने हवा (वारा ) सोडून सर्व गोष्टींवर कर लावला आहे. आणि जगाच्या पाठीवर ज्या देशांमध्ये असे कर लावले गेले ती सरकारं बदलल्याचा दाखला देत येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत देशात बदल होणार असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
मरणावर जातानाही जीएसटीद्वारे पाकीटमारी – जितेंद्र आव्हाड
केंद्र सरकारने अंत्ययात्रेच्या सामनावरही 18 टक्के जीएसटी लावून पाकीटमारी केल्याची घणाघाती टीका यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महाग असतानाही त्यांनी देशात कमी भागामध्ये पेट्रोल डिझेल उपलब्ध करून दिले होते. मात्र त्याच्या उलट परिस्थिती निर्माण होऊनही मोदी सरकारने इंधनाचे दर कमी केले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी बाणा संपवण्याचे कारस्थान – संजय राऊत
नरेंद्र मोदी – अमित शहा यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी बाणा संपवण्याचे कारस्थान रचले आहे. मात्र महाराष्ट्र याआधीही दिल्ली समोर झुकला नव्हता आणि आताही झुकणार नाही अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. तर औरंगजेब याचा जन्म नरेंद्र मोदींच्या गावात झाल्याचा पुनरुच्चार करीत मोदी शहा आपल्यावर आक्रमण करत आहेत. गेल्या दहा वर्षांत इथल्या खासदारांनी काय काम केलं? महाराष्ट्राने आतपर्यंत दादा- भाई खूप पहिले, त्यांचा अनुभव घेतला. मात्र यापुढे केवळ मामा चालणार असल्याचे सांगत सुरेश म्हात्रे यांचा भिवंडी लोकसभेत विजय पक्का असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
या जाहीर सभेला उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, जितेंद्र आव्हाड, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी, शहरप्रमुख सचिन बासारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.