Home ठळक बातम्या भाजप कल्याण जिल्हाध्यक्षपदी नाना सुर्यवंशी यांची नियुक्ती

भाजप कल्याण जिल्हाध्यक्षपदी नाना सुर्यवंशी यांची नियुक्ती

 

कल्याण दि.21 जुलै :
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात मोठे संघटनात्मक फेरबदल केले आहेत. राज्यातील जिल्हाध्यक्षांची धुरा तरुण आणि उमद्या नेतृत्वाच्या हाती सोपवत भाजपने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हाध्यक्षपदी अत्यंत अनुभवी आणि दांडगा जनसंपर्क असणाऱ्या नरेंद्र अर्थातच नाना नारायण सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे.

नरेंद्र सूर्यवंशी हे कल्याणच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रामध्ये नाना नावाने सुपरिचित आहेत. सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. 1995 पासून नाना सूर्यवंशी यांनी पक्षांमध्ये वेगवेगळ्या पदावर संगणक संघटनात्मक जबाबदाऱ्या उत्तमपणे पार पाडल्या आहेत. ज्यामध्ये युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कल्याण पूर्व शहराध्यक्ष, सलग दोन वेळा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष, ठाणे विभाग सचिव आणि पुन्हा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे सांभाळल्या आहेत. नाना सूर्यवंशी यांचा हा सर्व अनुभव लक्षात घेता भाजप पक्षश्रेष्ठीने त्यांच्यावर आता कल्याण जिल्हा भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

नाना सूर्यवंशी यांचा जनसंपर्कही दांडगा असून कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव, जरीमरी सेवा मंडळ, दि ईस्ट कल्याण वेल्फेअर सोसायटी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आदी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांवरही ते मानद पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर सोपवलेल्या या जबाबदारीला आपण पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया त्यांनी या नियुक्तीनंतर व्यक्त केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा