
कल्याण -डोंबिवली दि.12 जुलै :
कल्याण डोंबिवलीसाठी शासनाकडून लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने उद्या पुन्हा केडीएमसीतर्फे होणारे लसीकरण बंद राहणार आहे. त्यामुळे आज भल्यामोठ्या रांगेत उभे राहूनही लस न मिळाल्याने उद्याच्या आशेवर बसलेल्या नागरिकांच्या पदरी निराशा पडली आहे.
अनेक दिवसांच्या मोठ्या खंडानंतर केडीएमसीतर्फे आज तब्बल 22 ठिकाणी लसीकरण करण्यात आले. त्यामूळे साहजिकच प्रत्येक लसीकरण केंद्रांवर लोकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. तर लस संपल्यामुळे अनेकांना आज लस घेता आली नाही. मात्र आज नाही झाले तर उद्या लस मिळेल या आशेवर असणाऱ्या नागरिकांच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे. शासनाकडून लससाठा उपलब्ध नसल्याने लगेच उद्या लसीकरण बंद ठेवायची नामुष्की पुन्हा एकदा केडीएमसीवर ओढावली आहे. तर खासगी संस्थांकडे लस उपलब्ध असताना केडीएमसीची झोळी मात्र रिकामीच कशी असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.