
कल्याण दि.१७ एप्रिल :
कल्याणमध्ये पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या आमदार चषक राष्ट्रीय खुल्या बुद्धीबळ स्पर्धेमध्ये मुंबईच्या गौरव बागवेने विजेतेपद पटकावले. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कल्याण पश्चिमेच्या नटरंग हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या १७ राज्यातील तब्बल ६१३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये मुंबईच्या गौरव बागवेने पहिला क्रमांक तर चेन्नईच्या ग्रँडमास्टर लक्ष्मण आर.आर. यांनी दुसरा आणि पुण्याच्या मंदार लाडने तिसरा क्रमांक मिळवला. या तिघांसह स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते विविध बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, कल्याण तालुका बुध्दीबळ संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, विधानसभा समन्वयक प्रभुनाथ भोईर, माजी नगरसेवक जयवंत भोईर, मोहन उगले, शिवसेना उपशहर प्रमुख सुनील खारूक, शिवसेना विभागप्रमुख रामदास कारभारी, डॉ.धीरज पाटील, शाखाप्रमुख गणेश कोटे यांच्यासह कल्याण तालुका बुध्दीबळ संस्थेचे मोहित लडे, संघर्ष सोमण, डॉ.दीपक तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते.