प्रगती पोर्टलच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत आढावा
कल्याण दि. ८ फेब्रुवारी :
मुंबईसह (Mumbai) त्याच्या आसपासचा एमएम रिजन (MMR) सर्वात वेगाने विकसित होतोय. अशावेळी अखंड वीज ही काळाची आणि त्यासोबतच या परिसराचीही गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुंबई ऊर्जा मार्ग (MUM) हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रगती पोर्टलच्या माध्यमातून त्याच्या प्रगतीवर जातीने लक्ष देत आहेत.(Mumbai Urja Marg Project: Uninterrupted power supply to ‘MMR’ region including Mumbai)
अखंडित वीज ही काळाची गरज ओळखून प्रकल्पाची आखणी…
गेल्या दशकभरात मुंबईसोबतच त्याच्या आसपासच्या महानगर परिसरामध्ये (MMR Region) पायाभूत सुविधांचा अत्यंत वेगाने विकास होतोय. परिणामी या भागामध्ये औद्योगिक आणि रहिवासी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रचंड अशी वाढ झाल्याने विजेची मोठी मागणी पाहायला मिळत आहे. वाढता वीज वापर लक्षात घेता अशावेळी याठिकाणी अखंडित वीज उपलब्ध असणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखूनच केंद्र सरकारने ऊर्जा मंत्रालयातर्फे मुंबई ऊर्जा मार्ग हा आंतरराज्य महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. ज्याच्या माध्यमातून येत्या काळात मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये अखंड वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे.
आंतरराज्य ट्रान्समिशन नेटवर्कची (ISTS) उभारणी…
मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या माध्यमातून अखंड वीज पुरवठ्यासाठी एक आंतरराज्य ट्रान्समिशन नेटवर्कची (ISTS) उभारणी केली जात आहे. ज्यामुळे मुंबई आणि एमएमआर रिजनसाठी तब्बल २ हजार मेगावॉट अतिरिक्त वीज पुरवठा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यासोबतच या भागासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या वीज पुरवठ्याच्या ट्रान्समिशन नेटवर्कलाही बळ देण्याचे काम या महत्वाकांक्षी प्रकल्पातून केले जाणार आहे.
महाराष्ट्रासाठी बनणार गेमचेंजर प्रकल्प…
मुंबई उर्जा मार्ग हा एक आंतर-राज्य पारेषण प्रणाली प्रकल्प आहे. ज्यामध्ये पश्चिम क्षेत्र बळकटीकरण योजना-XIX (WRSS-XIX) आणि उत्तर-पूर्व क्षेत्र बळकटीकरण योजना-IX (NERSS-IX) संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, आसाम आणि अरुणाचल प्रदेशचा समेवश आहे. तर मुंबई उर्जा मार्ग पारेषण प्रकल्पांतर्गत मुंबई आणि एमएमआरमध्ये 100 किमी ट्रान्समिशन लाइन्सचे जाळे विणले जाणार आहे. ज्यामध्ये मुंबई आणि एमएम आरसाठी 2 हजार मेगावॅटहून अधिक अतिरिक्त वीज वाहून नेण्याची क्षमता असेल. आणि संपूर्ण राज्यात वीज प्रवाह सक्षम करण्यासाठी अत्यंत आवश्यक ट्रान्समिशन कॉरिडॉरची स्थापना केली जाईल. त्यातही 24 × 7 परवडणारी आणि हरित उर्जा ही मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पातून महाराष्ट्रासाठी उपलब्ध होणार असल्याने हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी नक्कीच गेम चेंजर बनेल असा विश्वास या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
प्रगती पोर्टलच्या माध्यमातून पंतप्रधान घेत आहेत सतत आढावा…
तर केंद्र सरकारतर्फे ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर पॉवर कॉरीडॉरचे जाळे उभारून वीज पुरवठ्याबाबत देशाला एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रगती पोर्टलच्या माध्यमातून या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा सतत आढावा घेत आहेत. त्यावरूनच देशाच्या उज्वल भविष्यासाठी या प्रकल्पाचे महत्व अधोरेखित होत आहे. मुंबई आणि एमएमआर रिजनची भविष्यातील विजेची गरज पूर्ण करण्यासाठी आणि या परिसराच्या अखंड वीज पुरवठ्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे अत्यावश्यक बनले आहे.