कल्याण दि. 19 ऑक्टोबर :
कल्याण पश्चिमेच्या एपीएमसी मार्केटमधील इमारतीच्या छतावर असलेल्या नामांकित कंपनीच्या मोबाईल टॉवरसाठी फिडर पिलरमधून थेट वीजचोरी होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा महिन्यांत या टॉवरसाठी 8 लाख 19 हजार रुपये किंमतीची तब्बल 56 हजार 150 युनिट वीज चोरून वापरल्याबद्दल मे. सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.
वीजचोरी शोध मोहिमेत शिवाजी चौक शाखा एकचे सहायक अभियंता मोहम्मद आरिफ शब्बीर खान, कर्मचारी विलास गायकवाड यांच्या पथकाने 8 ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीतील सी टाइप इमारतीच्या छतावरील मोबाईल टॉवरच्या वीजपुरवठ्याची तपासणी केली. त्यामध्ये याठिकाणी अधिकृत वीजजोडणी न घेता विनामीटर थेट वीजवापर होत असल्याचे आढळले. या मोबाईल टॉवरसाठी काळ्या रंगाची 40 मीटर केबल वापरून महावितरणबाबफिडर पिलरमधून थेट आणि अनधिकृतपणे वीजचोरी केल्याचे तपासणीतून उघड झाल्याचे पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
तर 18 मेपासून वीजचोरीचा हा प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले असून त्यानुसार वीजचोरीचे देयक आणि दंड भरण्याबाबत सुयोग टेलेमॅटिक्सला नोटीस बजावण्यात आली. परंतु संबंधित रकमेचा भरणा न झाल्याने सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध सहायक अभियंता खान यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी वीज कायदा 2003 च्या कलम 135 नुसार सुयोग टेलेमॅटिक्स विरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.