105 कोटींची थकबाकी; वीजबिल भरून सहकार्य करण्याचे महावितरणाचे आवाहन
कल्याण दि.17 जुलै :
वीज बिल थकबाकीदारांविरोधात महावितरणने आणखी कडक धोरण अवलंबण्यास सुरुवात केली असून कल्याण परिमंडळातील तब्बल हजार ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडीत केल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. या 70 हजार ग्राहकांकडे 105 कोटी रुपयांची थकबाकी असून चालू वीजबिलासह थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.
याव्यतिरिक्त कल्याण परिमंडलातील 7 लाख 83 हजार ग्राहकांकडे मार्च-2021पर्यंतची 402 कोटी रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय एप्रिल ते जून २०२१ या तीन महिन्यांची थकबाकी १४२ कोटींवर पोहचली आहे. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट असून वीज ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून अखंडित वीजसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.
कल्याण, डोंबिवलीचा समावेश असणाऱ्या कल्याण मंडल कार्यालय 1 अंतर्गत 8 हजार 771 ग्राहकांचा (7 कोटी 7 लाख थकीत), ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि उल्हासनगरचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालयाअंतर्गत 14 हजार 923 ग्राहकांचा (49 कोटी थकीत), वसई- विरार समाविष्ट असणाऱ्या वसई मंडल कार्यालयांतर्गत सर्वाधिक म्हणजे 27 हजार 527 ग्राहकांचा (28 कोटी 33 लाख) आणि पालघर जिल्ह्याचा समावेश असलेल्या (वसई व विरार विभाग वगळून) पालघर मंडलात 19 हजार 465 ग्राहकांचा (20 कोटी 74 लाख थकीत) वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक लघुदाब ग्राहकांनी नोव्हेंबर २०२० पासून वीजबिलाचा एक रुपयाही भरलेला नसल्याने नाईलाजास्तव त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक तसेच सार्वजनिक सेवेतील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन चालू आणि थकीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.
*…तर होणार कारवाई*
थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिल आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही. शेजाऱ्यांकडून अथवा चोरट्या मार्गाने वीजपुरवठा घेणे धोकादायक असून यात वीज देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांवरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे अधिकृतपणे वीज वापर करण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.