डोंबिवली पूर्वेतील 15 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
डोंबिवली दि.10 नोव्हेंबर :
रस्त्यांच्या कामासाठी आपण शासनाकडून निधी मंजूर करून आणला असून त्याची वर्क ऑर्डर आल्यानंतरच काम सुरू करत आहोत. मात्र काही वेळा नेते जातात, भूमिपूजन करतात आणि निघून जातात, रस्ते मात्र होत नाही. परंतु याठिकाणी असे घडणार नसल्याचे सांगत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. डोंबिवली पूर्वेतील विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात त्यांनी हा टोला लगावला.
राज्य शासनाकडून आपण निधी मंजूर करून आणला असून डोंबिवली पुर्व-पश्चिमेसह केडीएमसी क्षेत्रात 15 कोटींची विकासकामे आपण सुरू करतोय. प्रत्येक नगरसेवक प्रभागात जे गरजेचे रस्ते आहेत ते केले जाणार आहेत. तसेच शासनाकडून मंजूर झालेल्या 360 कोटी रुपयांच्या रस्ते कामांचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची (पीएमसी) नेमणूक झाली आहे. त्यांच्याकडून डीपीआर बनवून टेंडर फ्लोट होईल आणि या 360 कोटींच्या रस्त्यांची कामे 21 डिसेंबर किंवा डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होतील अशी माहितीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. जेणेकरून येत्या काळात कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात काँक्रीटच्या रस्त्यांचे जाळे विणले जाईल. आणि येणाऱ्या काळात रस्त्यावर पडणारे खड्डे आणि तो बुझवणे हा प्रश्नच राहणार नाही. पूर्ण रस्ते काँक्रीटचे होतील आणि मोठ्या प्रमाणात दळणवळण सुरळीत होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत…
ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी अमृत योजना मंजूर करून घेतली असून त्याचे काम बऱ्याच ठिकाणी सुरू आहेत. काही ठिकाणी पाण्याच्या टाक्यांसाठी जागा मिळालीय तर काही ठिकाणी अद्याप मिळणे बाकी आहे. शासनाच्या जागा हस्तांतरित करण्यासाठी येत्या 1-2 दिवसांत केडीएमसी अधिकारी, कलेक्टर आणि प्रांत यांच्यासोबत बैठक होणार असून हे सर्व प्रश्न मार्गी लागतील असेही खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.
तर कल्याण शिळ रोडवरील एमआयडीसीची पाईपलाईन 40 वर्षे जुने झाली असल्याने सतत फुटत असते. याबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका सुरू आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी मनुष्यबळ वाढवून आणि कमी शटडाऊन घेऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचे निर्देश आपण दिल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. अंबरनाथ ते शिळफाटा काम पूर्ण झाल्यानंतर पाईपलाईन फुटण्याचे प्रमाण कमी होण्यासह ग्रामीण भागात भेडसावत असणारा पाण्याची समस्याही सुटण्यास मदत होईल असे ते म्हणाले.
यावेळी शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण ग्रामीण शिवसेना पदाधिकारी प्रकाश म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.