खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सल्ला
कल्याण दि.5 जानेवारी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्यावर सर्वच स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त होत असून कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही जितेंद्र आव्हाड यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. हिंदू देवतांबद्दल आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत आव्हाडांनी पडू नये. त्याऐवजी त्यांनी अफजल खान, औरंगजेब, खिलजी यांनी काय केलं ते काय खात होते याचे प्रवचन जे आहे ते मुंब्र्यामध्ये जाऊन दिले पाहिजे असा सल्ला कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आव्हाड यांना दिला आहे.
हिंदू देवता, हिंदुत्वावर बोलणे ही आव्हाड यांची सवय झाली आहे आणि त्यांची गरजही आहे. कारण ते जर का असे बोलले नाही तर ज्या मतदारसंघातून निवडून येतात, तिकडे राजकारण ते करू शकत नाही असे सांगत खासदार डॉ. शिंदे यांनी टीकास्त्र सोडले.
तसेच राजकारणाची पातळी एवढ्या खाली जाईल हे आपल्याला वाटलं नव्हतं. कारण प्रभू श्रीराम हे आपलेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. आणि त्यांच्याबद्दल अशा गोष्टी बोलणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई केली पाहीजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
तर आव्हाड यांना कशात तरी पीएचडी वैगेरे पण मिळालेली असून ते खूप विद्वान आहेत. मात्र त्यांनी आमच्या देव देवतांवर न बोलता अफजल खान, औरंगजेब, खिलजी यांनी काय केलं, ते काय खात होते याचे प्रवचन मुंब्र्यामध्ये जाऊन दिले पाहिजे. लोकांना हिंदू देवतांबद्दल शिकवण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये असा सल्लाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आव्हाड यांना दिला आहे.