कल्याण दि.8 जानेवारी :
कल्याण पश्चिमेतील आग्रा रोडवर आज सकाळी एक भीषण अपघात घडला आहे रस्ता ओलांडत असणाऱ्या आई आणि 3 वर्षांच्या चिमुरड्याला डंपर ने दिलेल्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.(Mother and child crossing road in Kalyan hit by dumper; Both died on the spot)
कल्याण पश्चिम येथील आग्रा रोड परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथील चौकात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. आपल्या 3 वर्षांच्या चिमुरड्याला शाळेतून घरी घेऊन जात असताना चौकामध्ये केडीएमसीसाठी काम करणाऱ्या खासगी डंपरने या दोघांना धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की जागेवरच या दोघांचाही मृत्यू झाला. निशा अमित सोमेस्कर आणि अंश अमित सोमेस्कर अशी या अपघातात मुर्त्युमुखी पडलेल्या दोघांची नावं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा कल्याण शहराच्या प्रमुख चौकातील वाहतूक आणि त्या ठिकाणाहून रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
संतप्त मनसैनिकांचा घटनास्थळी रास्ता रोको…
या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संतापलेल्या मनसेच्या वतीने घटनस्थळी रास्ता रोको करण्यात आल्याने तणावाचा वातावरण पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या मध्ये असणारा डिव्हायडर काढल्याने हा अपघात झाल्याचे मनसैनिकांसह नागरिकांचे म्हणणं आहे. तसेच दिवसा अनेक मोठमोठे ट्रक या रस्त्यावरुन जात असतात त्यांना याठिकाणी मोठया गाड्यांच्या वाहतुकीला बंद घालावी आणि या रस्त्यावर सिग्नल यंत्रणा लावण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलेली आहे.
दरम्यान या अपघातामध्ये दोन जणांचे जीव गेल्यानंतर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला रस्त्यामध्ये बॅरीकेटिंग लावण्याचा शहाणपणा सुचला आहे.