केडीएमसी शहर अभियंतापदी अर्जुन अहिरे यांची नियुक्ती
कल्याण डोंबिवली दि.७ ऑक्टोबर :
केडीएमसीची बरीच आरोग्य केंद्र वर्षानुवर्षे बंद होती, ती नागरिकांसाठी पुन्हा नव्याने आम्ही सुरू करू शकलो. महापालिका आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करण्यात योगदान देऊ शकलो याचे सर्वाधिक समाधान असल्याचे प्रांजळ मत केडीएमसीच्या मावळत्या शहर अभियंता सपना कोळी – देवनपल्ली यांनी व्यक्त केले. सपना कोळी – देवनपल्ली यांच्या जागी अर्जुन अहिरे यांची केडीएमसीचे नवे शहर अभियंता म्हणून शासनाकडून नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी पदभार स्वीकारल्यानंतर मावळत्या शहर अभियंत्या कोळी – देवनपल्ली यांनी हे मत व्यक्त केले.
चार्ज घेतला तेव्हा बरेच प्रकल्प रखडलेले होते…
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आपण चार वर्षांपूर्वी चार्ज घेतला तेव्हा असे दिसून आले की बरेच प्रकल्प रखडलेले होते. वडवली पुल २००८ पासून प्रलंबित होता, कोपर पुलाचे कामही बाकी होते. ही सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण केल्याचे नक्कीच समाधान असल्याचे सपना कोळी – देवनपल्ली यांनी सांगितले.
कोवीड काळात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची निर्मिती…
कोवीड काळात ज्यावेळी कल्याण डोंबिवलीत महापालिकेचा एकही आय सी यू बेड नव्हता. त्यावेळी तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तम काम करू शकलो आणि भरपूर आरोग्य केंद्र, आयसीयू बेड निर्माण करू शकलो. ज्यामुळे कोवीडच्या अत्यंत कठीण काळात गरजेच्या वेळी लोकांना त्याची सुविधा उपलब्ध होऊ शकली. तर कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली येथे उभारण्यात आलेल्या मॅटर्नीटी होम सुविधेचेही लोकार्पण करण्यात आले आहे. अवघ्या महिन्याभरात याठिकाणी सुमारे१०० च्या आसपास गर्भवतींची प्रसूती झाल्याचा अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
४० एकरावर साकारला बायो डायव्हर्सिटी पार्क प्रकल्प…
कल्याण जवळील आंबीवली येथे महापालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच बायो डायव्हर्सिटी प्रकल्प राबविण्यात आला. ज्याचे गेल्या चार वर्षांपासून अत्यंत चांगले आणि सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. या बायो डायव्हर्सिटी पार्कमध्ये विविध प्रजातीचे फुलपाखरू, पक्षी दिसून येत आहेत. आणि कल्याण डोंबिवलीतील नागरिकांसह पर्यावरण प्रेमींसाठीही ताण तणाव दूर करण्यासाठी एक चांगले केंद्र निर्माण करू शकले याचे समाधान असल्याचे सपना कोळी देवनपल्ली म्हणाल्या.
चांगल्या सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याला प्राधान्य…नवनियुक्त शहर अभियंता अर्जुन अहिरे
कल्याण डोंबिवलीकरांना चांगल्या सुविधा वेळेत कशा मिळतील याकडे आमचे प्राधान्य दिले जाईल अशी प्रतिक्रिया केडीएमसीचे नवनियुक्त शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी यावेळी दिली.
केडीएमसीमध्ये प्रलंबित असणारे प्रकल्प नियमात आणि वेळेत राहून लवकरात लवकर पूर्ण करून घेणे, तसेच मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री आणि कल्याण डोंबिवलीतील सर्व लोकप्रतिनिधी महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार आपण इंजिनिअरिंग टीमकडून ही कामे वेळेत पूर्ण करू असा विश्वासही अहिरे यांनी यावेळी व्यक्त केला.