मनसे नेते,आमदार राजू पाटील करणार नेतृत्व
डोंबिवली दि. १६ एप्रिल :
येत्या सोमवारी १८ एप्रिल रोजी मनसेतर्फे पाणीप्रश्नाला वाचा फोडण्यासाठी केडीएमसी मुख्यालयावर तहान मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे आमदार आणि नेते राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात जटील झालेल्या पाणीप्रश्नाला वाचा फोडण्यासह पाणीप्रश्नी झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हा मोर्चा असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना पाठवलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. तर डोळ्यांतून पाणी आणले, नळातून कधी येणार? तहानलेली आहे कल्याण डोंबिवली, २५ वर्षे काय अंडी उबवली? असे सवाल या मोर्चाबाबत बनवलेल्या बॅनरमध्ये विचारण्यात आले आहेत.
येत्या सोमवारी कल्याण पश्चिमेच्या सर्वोदय मॉल ते केडीएमसी मुख्यालय या मार्गाने सकाळी १० वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.