कल्याण/ डोंबिवली दि.12 फेब्रुवारी :
पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर आणि वाढीव वीजबिलांविरोधात कल्याणात मनसेने मोर्चा काढलेला पाहायला मिळाला. सरकारचा निषेध म्हणून काळे कपडे घालून मनसैनिक आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. कल्याण तहसिलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
एकीकडे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने जनता त्रस्त असतानाच दुसरीकडे वाढीव विजबिलांमूळे तर सामान्य नागरिक अक्षरशः भरडून निघाला आहे. या दोन्ही प्रश्नावर कल्याण डोंबिवलीतील मनसेने आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला. अन्यायकारक दरवाढ रद्द झालीच पाहीजे, केंद्र सरकार हाय हाय, राज्य सरकार हाय हाय, वीजबिल दरवाढ रद्द झालीच पाहीजे अशा जोरदार घोषणाबाजीने मनसैनिकांनी सर्व परिसर दणाणून सोडला. मोर्चातील एका शिष्टमंडळाने कल्याणचे तहसीलदार दिपक आडके यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले.
या मोर्चामध्ये मनसेचे उपाध्यक्ष काका मांडले, प्रदेश सचिव इरफान शेख, माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, प्रकाश भोईर, कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, विनोद केणे यांच्यासह उर्मिला तांबे, सरोज भोईर, मंदा पाटील, कस्तुरी देसाई, दिपीका पेेडणेकर आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वच प्रमूख राजकीय पक्ष सक्रीय झालेले पाहायला मिळत आहेत.