रुख्मिणीबाई रुग्णालयाबाहेर झालेल्या प्रसूतीच्या घटनेने संताप व्यक्त
कल्याण दि.11 सप्टेंबर :
प्रसूतीसाठी दाखल करून न घेतल्याने रुग्णालयाबाहेर प्रसूती झाल्याच्या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत असून याप्रकरणी आम्ही रुग्णालय प्रशासनाला मनसे स्टाईल जाब विचारू अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. रुग्णालय प्रशासनाने दाखल करण्यास नकार दिल्याने रुग्णालयाबाहेरच महिलेची प्रसूती झाल्याच्या घटनेने कल्याण डोंबिवलीतील वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय, सामाजिक आणि सामान्य नागरिकांकडून या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. (MNS will ask the hospital administration for that incident in our style- MLA Raju Patil)
कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात स्कायवॉकवर राहणाऱ्या गर्भवती महिलेला शनिवारी रात्री पोटात दुखू लागल्याने रुक्मीणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. मात्र स्टाफ नसल्याचे कारण देत रुख्मिणीबाई रुग्णालयाने तिची प्रसूती करुन घेण्यास नकार दिला. त्यावेळी तिला घेऊन आलेल्या पोलिसांनी महिलेची अवस्था गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करून घेण्याची विनंती केली. मात्र ती धुडकावून लावत या महिलेला प्रसूतीसाठी महापालिकेच्या वसंत व्हॅली येथील प्रसूतीगृहात घेऊन जा असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. मात्र तोपर्यंत या महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्याने अखेर रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच तिची प्रसूती झाली. रुग्णालय प्रशासनाच्या या असंवेदनशील कारभाराचे सगळीकडे तीव्र पडसाद उमटत असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
तर कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनीही झालेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत केडीएमसी प्रशासनाला धारेवर धरले. हे सर्व जण गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत. या प्रकरणातील दोषींना निलंबित करतील किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही येत्या दोन चार दिवसांत मनसे स्टाईलने तिकडे जाऊन रुग्णालय प्रशासनाला जाब विचारू अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे? तसेच अशा घटना घडूनही हे सुधारत नसतील तर इकडचा नागरिक म्हणून आमचं कर्तव्य आहे. आणि आम्ही त्यांना जाऊन जाब विचारणारच असे सांगत केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावरही पाटील यांनी टिका केली.