डोंबिवली दि.६ मे :
मनसेच्या माजी नगरसेविका पूजा पाटील आणि तालुका प्रमुख गजानन पाटील यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर सडकून टीका करत खोट्या केसेसच्या धमक्या देत दबाव टाकला जात असल्याचा आरोप आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर केला. भोंगा आंदोलनाबाबत मानपाडा पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीवर जबाब नोंदवण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी आज मानपाडा पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना आमदार राजू पाटील यांनी हा आरोप केला.
कालच हे पती पत्नी येऊन आपल्याला भेटले आणि खोट्या केसेसच्या धमक्या देत पक्ष प्रवेशासाठी दबाव टाकला जात असल्याचे त्यांनी सांगितल्याचे आमदार राजू पाटील म्हणाले. तर अशा प्रकारचे घाणेरडं राजकारण करत जर कोणी पक्ष वाढवित असेल तर ही दुदैवाची बाब आहे. पक्षप्रमुखच “कोत्या” मनाचे आहेत, मग त्यांच्या पिल्लाकडून काय अपेक्षा करणार असा सवाल करत आमदार राजू पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
तर दुसऱ्या पक्षातील लोकांना धमकावून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडले जात असून आम्हाला हे अपेक्षितच असल्यामुळे अशा घटना भविष्यात घडल्या तर आश्चर्य वाटणार नाही. तर प्रत्येक मनसैनिक हा इथला नगरसेवक , आमदार असल्यामुळे कोणी पक्षातून गेल्यामुळे आम्हाला फरक पडणार नसल्याचेही आमदार राजू पाटील यांनी सांगितले.