
कल्याण दि. 17 फेब्रुवारी :
विविध प्रश्नांबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी आज कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. महापालिका आयुक्तांनीही यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.
डोंबिवली पूर्वेच्या नांदिवली येथील स्वामी समर्थ मठ रस्त्याचे काम तत्काळ सुरु करावे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेला गती देण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करणे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका विकास आराखडाअंतर्गत बाह्यवळण रस्तारुंदीकरण प्रकल्पांत बाधित रहिवाशांचे पुनर्वसन करावे, महानगरपालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या शास्तीच्या रकमेवर ठाणे महानगरपालिकेप्रमाणे १०० टक्के सूट द्यावी यांसह डोंबिवली औद्योगिक विभागासह 9 गावांतील मालमत्ता कराची सुधारीत बिले तत्काळ वितरीत करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी यावेळी केल्या.
यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांच्यासोबत मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हा संघटक हर्षद पाटील आणि डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत उपस्थित होते.