डोंबिवली दि.24 जानेवारी :
डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्यास मंजूरीसाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली. डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्याचा प्रश्न २००९ पासून प्रलंबित आहे. तत्कालिन आमदार स्व. हरिश्चंद्र पाटील यांनी या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न करुन पाठपुरावा केला होता.
त्यावेळी या रस्त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करुन एमएमआरडीएने ९३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर या रस्त्याचा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला असून अद्याप गती मिळालेली नाही. सध्या कोरोनामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वेसेवा बंद असल्याने रस्ते वाहतुकीचे महत्त्व सर्वांना कळत आहे. दिवा, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली परिसरातील नागरिकांना कल्याण-शिळ रस्त्यावर अवलंबून रहावे लागत असून या रस्त्यावर प्रचंड वाहतुक कोंडी होत असते. या परिसरातील वाढत्या नागरिकरणामुळे भविष्यात कल्याण शिळ रस्त्यावरुन पायी चालायला जागा उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे डोंबिवली-मुंब्रा रेल्वे समांतर रस्ता अत्यंत आवश्यक असल्याचे मत आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले. तसेच आजही डोंबिवली,कोपर,दिवा, मुंब्रा परिसरातील नागरिकांना रेल्वे वाहतुकीशिवाय कोणताही पर्याय नाही. अतिवृष्टी किंवा तांत्रिक कारणामुळे रेल्वेसेवा बंद पडल्यास येथील रहिवाशांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. याआधी अनेक वेळा असे प्रकार घडलेले असून चार-चार दिवस लोकांचा जनसंपर्क पूर्णपणे तुटलेला होता.
तसेच सर्व तांत्रिक अडचणींवर मात करुन पर्यावरणाचा समतोल राखून, खासगी जमीनमालकांना योग्य मोबदला देऊन हा रस्ता पूर्ण करणे शक्य आहे. तरी डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी करण्याबरोबरच रेल्वे प्रवाशांना सोयीस्कर पर्यायी मार्ग उपलब्ध होईल असे आमदार राजू पाटील म्हणाले.
वास्तविक हा रस्ता झाला तर डोंबिवली ते मुंब्रा हे अंतर ५ ते ७ मिनिटांवर येईल. परंतु मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नुकतेच खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी. चे अंतर फक्त ६ कि.मी. ने कमी होऊन १३.३ कि.मी. इतके होईल. त्यासाठी ₹ ६ हजार ६०० कोटी खर्च करणाऱ्या एमएसआरडीसीला दुर्दैवाने हा रस्ता लवकर व्हावा असे न वाटल्याचे सांगत त्यासाठीच आपण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याचे आमदार राजू पाटील म्हणाले. ‘भिवंडी-नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि ठाणे-पनवेल राष्ट्रीय महामार्ग (मुंब्रा येथे जोडून ) या दोन्ही रस्त्यांना माणकोली-डोंबिवली-दिवा-मुंब्रा असे जोडून हा प्रकल्प केंद्रीय स्तरावर राबविण्यात येण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी यावेळी केली.