भोपरपाठोपाठ काटई गावातील निर्माणाधीन जलकुंभाच्या स्लॅबचा भाग कोसळला
कल्याण ग्रामीण दि.१६ मे :
कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमधील पाणी समस्या दूर करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत जलकुंभांचे काम सुरू आहे. यापैकी भोपर आणि काटई गावातील निर्माणाधीन जलकुंभाच्या स्लॅबचा भाग कोसळल्याचा प्रकार समोर आला असून या कामाच्या दर्जावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. काटई गावातील या जलकुंभ बांधणीच्या कामाची आमदार यांनी आज पाहणी केली.
अधिकारी आणि ठेकेदारांना धरले धारेवर…
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आलेल्या २७ गावांमध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी सध्या अमृत योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणत काम सुरू आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत भले मोठे जलकुंभ उभारण्याचे काम सुरू आहे. यापैकी भोपरपाठोपाठ काटई गावातील जलकुंभाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. याची माहिती मिळताच आमदार राजू पाटील यांनी आज या कामाची पाहणी करत अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलेच धारेवर धरलेले पाहायला मिळाले.
जलकुंभाच्या कामाचे व्हीजेटीआय मार्फत ऑडिट करण्याची मागणी…
तसेच जलकुंभ उभारण्याची ही कामे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून होत असल्याचा गंभीर आरोपही मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला. सोमवारी भोपर भागातही अशाच प्रकारे जलकुंभाचा काही भाग कोसळला. त्यापाठोपाठ आज सलग दुसऱ्या दिवशी काटई येथेही तसाच प्रकार घडला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र या जलकुंभाच्या कामाचे व्हीजेटीआय मार्फत ऑडिट करण्याची मागणी करत आमदार पाटील यांनी संबंधित ठेकेदाराच्या गुणवत्तेची लेखी तक्रार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
दुरूनच संवाद साधणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना खडसावले…
दरम्यान आमदार राजू पाटील यांनी स्वतः जागेवर जाऊन पाहणी करत योग्य प्रकारे काम होत नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी शासकीय अधिकारी त्यांच्याशी दुरूनच बोलत होते. त्यामुळे संतापलेल्या आमदार पाटील यांनी त्यांना इकडे या नाहीतर मारीन अशा शब्दांत खडसावल्याचेही दिसून आले.