कल्याण दि.7 मार्च :
शहरातील विविध नागरी समस्यांसंदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ कल्याण शहर मनसेतर्फे आज केडीएमसी मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. तसेच केडीएमसी प्रशासनाने येत्या 15 दिवसांत या समस्यांवर उपाययोजना केल्या नाहीत तर मनसे स्टाईल हिसका दाखवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करणे, रिंग रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे, काळा तलाव परिसरात सीसीटीव्ही लावणे, स्मशानभूमीत मोफत लाकडं पुरवणे, मंजूर जलकुंभांची कामे त्वरित सुरू करणे,पाण्याचे बिल वेळेवर देणे, उद्यानांमध्ये स्वच्छता ठेवणे या आणि अशा विविध नागरी समस्यांसंदर्भात मनसेने हा मोर्चा काढला.
यावेळी झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासनाने मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच येत्या १५ दिवसात प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास मनसे स्टाईलने सुतासारखे सरळ करू असा अल्टीमेटमही देण्यात आला आहे.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माजी आमदार, शहराध्यक्ष प्रकाश भोईर, महिला शहराअध्यक्ष कस्तुरी देसाई यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.