Home ठळक बातम्या आमदार रविंद्र चव्हाण यांचे शिवसेना नेत्यांवरील आरोप केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी – शहरप्रमुख...

आमदार रविंद्र चव्हाण यांचे शिवसेना नेत्यांवरील आरोप केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी – शहरप्रमुख राजेश मोरे

 

डोंबिवली दि.31 मे :
डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर केले जाणारे आरोप हे केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचा पलटवार शिवसेनेने भाजपवर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून विविध मुद्द्यांवर एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टिका केली जात आहे. त्यावर आता शिवसेनेनेही आपले मौन सोडत भाजप आणि आमदारांवर सडकून टिका केली. शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप आमदार चव्हाण यांनी केलेले आरोप फेटाळून लावले.

गेल्या 11 वर्षांपासून आमदार रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीत आमदार आहेत. मात्र या कार्यकाळात त्यांनी डोंबिवलीसाठी केलेले एक तरी विधायक काम दाखवून द्या, त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी डोंबिवलीला सर्वात घाणेरडे शहर असे का म्हटले? कोवीड आल्यापासून गेल्या 2 वर्षांत आमदार चव्हाण यांनी काय काम केले? यासारखे विविध प्रश्न उपस्थित करत राजेश मोरे यांनी आमदार चव्हाणांवर निशाणा साधला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात केलेल्या विकासकामांची यादी वाचण्यासाठी वेळ कमी पडेल. आपल्यानंतर राजकारणात आलेल्या आणि खासदार झालेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मिळत असणारा लोकांचा पाठींबा पाहून त्याच्या आकसापोटी आमदार चव्हाण यांच्याकडून असले आरोप होत असल्याचेही राजेश मोरे म्हणाले.

तर कचरा शुल्क लागू केल्याप्रश्नी आमदार चव्हाण यांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे राजेश कदम यांनी यावेळी सांगितले. एकीकडे पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ झाल्याने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यासाठीही आमदार चव्हाण यांनी कधी तरी बॅनरबाजी करावी असा टोला राजेश कदम यांनी यावेळी लगावला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा