कचरा टाकणाऱ्या दुकानदार आणि नागरिकाचे ही टोचले कान
कल्याण डोंबिवली दि. १९ ऑक्टोबर :
मंगळावर सकाळपासून कल्याण डोंबिवलीत सुरू झालेल्या खड्डे भरण्याच्या आणि विशेष स्वच्छता मोहिमेची केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी काल रात्री अचानक पाहणी केली. मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या या पाहणी दौऱ्यात त्यांनी सरप्राईज व्हीजिट तर केलीच, पण त्याचसोबत डोंबिवलीतील फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसून आले.
शहरातील स्वच्छता आणि रस्त्याच्या दुर्दशेवरून आधी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि त्यानंतर कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्तांकडून दिवाळीपूर्वी कल्याण आणि डोंबिवली शहरं स्वच्छ आणि खड्डेमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. कालपासून म्हणजेच मंगळवार १९ ऑक्टोबरपासून या विशेष स्वच्छता आणि खड्डेमुक्त रस्त्यांच्या मोहिमेला कल्याण डोंबिवलीत एकाच वेळी सुरुवात करण्यात आली आहे.
खड्डे भरण्याचे तसेच दोन्ही शहरातील कचरा उचलण्याचे काम व्यवस्थित सुरू आहे की नाही याची माहिती घेण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी काल रात्री अचानक पाहणी दौरा केला. त्याची सुरुवात त्यांनी कल्याण पूर्वेच्या वालधुनी परिसरातून केली. त्यानंतर कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक येथील कामांची पाहणी करून त्यांनी डोंबिवली शहराकडे आपला मोर्चा वळवला. डोंबिवलीतही विविध ठिकाणी अचानक भेट देत खड्डे भरणी आणि स्वच्छतेच्या कामांचा डॉ. दांगडे यांनी आढावा घेतला. त्यावेळी स्वच्छ केलेल्या जागांवर कचरा टाकणाऱ्या नागरिक आणि दुकानदारांनाही खडे बोल सुनावले.
फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून अधिकारी फैलावर…
दरम्यान यावेळी डोंबिवली स्टेशन परिसरातील स्वच्छता मोहिमेची पाहणी करण्यासाठी डॉ. दांगडे यांनी भेट दिली खरी. मात्र याठिकाणी मोठ्या असणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रात्री १२ – १२ वाजूनही हे फेरीवाले इकडे बसताताच कसे? त्यांना हटवण्यासाठी तुम्ही कशाची वाट पाहत आहात? आपल्याला याठिकाणी हे फेरीवाले परत दिसता कामा नये अशा शब्दांत आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी अधिकाऱ्याची कान उघाडणी केल्याचे पाहायला मिळाले.
पालिका कार्यालयात दिवाळी गिफ्ट स्विकाराल तर खबरदार – आयुक्तांचे आदेश
कल्याण डोंबिवली महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पालिकेत स्वतः किंवा आपले कुटुंबीय, खासगी व्यक्तींच्या माध्यमांमधून दिवाळी भेटीचा स्वीकार करू नये, या आदेशाचे परीपत्रक आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी मंगळवारी काढले आहे. तसेच हे परिपत्रक महापालिकेच्या मुख्यालयासह विविध कार्यालयांमध्येही लावण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या २५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे केडीएमसीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपली दिवाळी गिफ्ट केडीएमसी कार्यालयांबाहेरच स्वीकारावी लागणार आहे.