डोंबिवली दि.9 जानेवारी :
कल्याण-शिळ मार्गावरील डोंबिवली नजीक असलेल्या देसाई गावाच्या हद्दीत बारवी धरणातून येणारी औद्योगिक महामंडळाची मुख्य पाईपलाईन फुटल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. शिवाय कल्याण-शीळ मार्गाला अक्षरशः पूरसदृश्य परिस्थिती निमार्ण झाल्याने मार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
बदलापूरच्या बारवी धरणातून ठाणे महानगरपालिका व डोंबिवलीतील काही भागात पाणी पुरवठा करणारी ही जलवाहिनी देसाई फुटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी प्रथमेश जोगळेकर यांनी दिली आहे. अचानक जलवाहिनी फुटून तिचं पाणी प्रचंड वेगाने रस्त्यावर आल्याने रस्त्याची एक बाजू रात्री उशिरापर्यंत बंद होती. त्यामुळे या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या पाइपलाईनद्वारे दिवा, मुंब्रा, कळवा या ठिकाणी पाणी पुरवठा होत होता. या पाइपलाईनच्या दुरुस्तीसाठी नेमका किती वेळ लागेल हे अधिकृतरित्या अद्याप एमआयडीसीकडून सांगण्यात आलेलं नाही. तोवर या ठिकाणचा पाणी पुरवठा बंद असणार आहे.