Home ठळक बातम्या एमसीएचआयतर्फे १९ ते २२ मे दरम्यान कल्याणात प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन

एमसीएचआयतर्फे १९ ते २२ मे दरम्यान कल्याणात प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन

 

३५ नामांकित विकासकांचे १५० हून अधिक गृहप्रकल्पांचा समावेश

कल्याण – डोंबिवली दि.१४ मे :
अनेकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या क्रेडाई- एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिटतर्फे १९ ते २२ मे दरम्यान कल्याणात प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याणातील वासुदेव बळवंत फडके मैदानावर होणाऱ्या या प्रदर्शनाचे ११ वे वर्ष असून ३५ नामांकित विकासकांचे तब्बल १५० हून अधिक गृहप्रकल्पांचा यामध्ये समावेश असणार आहे. क्रेडाई- एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिटतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

या ११ व्या प्रदर्शनाचे उद्घाटन १९ मे रोजी सकाळी ११ वाजता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज मंत्री कपील पाटील, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आमदार रवींद्र चव्हाण, आ. प्रमोद पाटील, आ. विश्वनाथ भोईर, आ. गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत होणार आहे.

गेल्या १० वर्षांच्या काळात या प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो ग्राहकांनी आपल्या स्वप्नातील घर प्राप्त केले आहे. तर २ वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनामुळे सगळंच चित्र बदललं. मात्र आता कोवीडचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांच्या बजेटमध्ये आणि त्यांना परवडेल अशा दरात स्वप्नातील घर प्राप्त करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मिळाल्याचे क्रेडाई- एमसीएचआय कल्याण डोंबिवली युनिटचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी सांगितले. तसेच यामध्ये लोकांना ३५ प्रसिध्द विकासकांचे १५० हून अधिक गृह प्रकल्पांचे आराखडे, संकल्पचित्र एका ठिकाणी पाहण्यास मिळणार आहेत.

करोना महासाथीच्या दोन वर्षात अनेक रहिवाशांची स्वप्नातील नवे घर घेण्याची इच्छा होती. कठोर टाळेबंदी, करोनाचा धोका त्यामुळे बांधकाम व्यवसाय ठप्प होता. घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. आता महामारी संपुष्टात आल्याने लोक नवीन घराच्या शोधासाठी बाहेर पडली आहेत. त्यांना एका छताखाली, एका ठिकाणी स्वप्नातील, कुटुंबीयांच्या मनातील आपल्या आर्थिक चौकटीतील घर खरेदी करता यावे या उद्देशातून या मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एमसीएचआयचे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा