
भाजप नगरसेवकांच्या प्रस्तावित शिवसेना प्रवेशावर आमदारांनी व्यक्त केली खंत
कल्याण दि.22 नोव्हेंबर :
भाजप नगरसेवकांच्या प्रस्तावित शिवसेना प्रवेशावर भाजप नेते आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून ‘आम्ही कुठे तरी कमी पडलो’ अशी खंत व्यक्त करत त्यांनी या नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कल्याणात आज महाविकास आघाडी सरकारविरोधात काढलेल्या मोर्चानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भाजपातील नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आज संध्याकाळी मुंबईत हे भाजप नगरसेवक शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधण्याची दाट शक्यता आहे. या भाजप नगरसेवकांच्या प्रस्तावित शिवसेना प्रवेशावर आमदार रविंद्र चव्हाण यांना प्रसिद्धी माध्यमांनी विचारणा केली. त्यावर बोलताना आमदार चव्हाण म्हणाले की आम्हालाही आपल्याकडूनच या प्रवेशाबाबत समजलं आहे. भाजपचे कार्यकर्ते, एवढी वर्षे ज्यांनी पक्षात काम केले असे काम करणारे कार्यकर्ते सोडून जातात. त्यावेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख होत असल्याचे ते म्हणाले. तर भारतीय जनता पक्ष ते का सोडून चालले आहेत, याचे कारण त्यांनाच माहीत असावे. मात्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख वाटते की आम्ही कुठे तरी कमी पडलो की काय? अशी खंतही आमदार चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच शिवसेना प्रवेश करणाऱ्या या नगरसेवकांना शुभेच्छाही दिल्या.