कल्याण दि.20 डिसेंबर :
काही परप्रांतीयांच्या मनामध्ये मराठी माणसाबद्दल असलेली आसुया दाखवणारा आणखी एक संतापजनक प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. भांडण सोडवण्याच्या क्षुल्लक कारणावरून शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तीने गुंडांना बोलावून मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटीत घडला आहे. इतकंच नाही तर ही मारहाण करताना “तुम्ही मराठी माणसं घाण आहात, तुम्ही मटण मच्छी खाता, तुम्ही मराठी झोपडपट्टीत राहणारे आहेत” अशा शब्दांमध्ये या परप्रांतीय शुक्ला कुटुंबाने उभ्या महाराष्ट्राचे, मराठीचे आणि इथल्या मराठी माणसाच्या अब्रूचे धिंडवडे काढले आहेत.
मात्र या प्रकरणानंतर संतापलेल्या शेकडो स्थानिक मराठी रहिवाशांनी एकत्र येत पोलिसांनी कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. तर मनसेनेही आक्रमक भूमिका घेत या मराठीद्वेष्ट्या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
कल्याण पश्चिमेतील योगिधाम परिसरात असलेल्या अजमेरा हाईट्स या हायप्रोफाईल सोसायटीत हा प्रकार घडला आहे. भांडण सोडवायला गेलेल्या देशमुख कुटुंबीयांना अखिलेश शुक्लानी इतर सहकाऱ्यांच्या साथीने लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसेच ही मारहाण करताना त्यावेळीं मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह विधानही करण्यात आल्याचे देशमुख कुटुंबियांकडून सांगण्यात आले. या प्रकारानंतर काल रात्री योगीधाम परिसरातील मराठी माणसांचा चांगलाच संताप पाहायला मिळाला.
या हल्ल्याच्या निषेधार्थ योगीधाम परिसरातील मराठी माणसांनी एकत्र येत बॅनर लावून तसेच एकत्र जमून या घटनेचा निषेध केला. तसेच या हल्लेखोराला अटक केली नाही तर डी सी पी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा संतप्त इशारा यावेळी स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. तर महाराष्ट्रात असे प्रकार अजिबात सहन केले जाणार नसून संबंधित व्यक्तीवर कडक कारवाईची मागणी करत आम्ही सर्व जण या मराठी कुटुंबियांच्या पाठीशी उभे असल्याचे कल्याण शहर मनसेने स्पष्ट केले आहे.
तर खडक पाडा पोलिसांकडून याप्रकरणी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई, ठाणे आणि आता कल्याणातील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राहणाऱ्या परप्रांतीय लोकांचा मराठी द्वेष विविध घटनांमधून दिसून आला आहे. महाराष्ट्रात राहायचं, महाराष्ट्राच्या जीवावर मोठं व्हायचं आणि मग इथल्याच मराठी माती आणि मराठी माणसाच्या मुळावर उठायचे हे प्रकार वाढतच चालले आहेत. अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून त्यांचा बंदोबस्त करण्याची नितांत गरज दिसत आहे. अन्यथा आपल्याच राज्यामध्ये आपल्याला परक्यासारखे जगणे नशिबी येऊ नये म्हणजे झाले.