Home क्राइम वॉच कल्याणातील मराठी कुटुंब हल्लाप्रकरण; अखेर अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात

कल्याणातील मराठी कुटुंब हल्लाप्रकरण; अखेर अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात

हल्लाप्रकरणात एकूण 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कल्याण दि.20 डिसेंबर :
संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभर गाजलेल्या कल्याणातील मराठी कुटुंबाच्या हल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावरून आज महाराष्ट्राची विधानसभा, राजकीय वर्तुळ आणि कल्याणमध्ये प्रचंड असा गदारोळ झालेला पाहायला मिळाला. (Marathi family assault case in Kalyan; Finally, Akhilesh Shukla is in police custody)

कल्याणच्या योगी धाम येथील अजमेरा हाइट्स या उच्चभ्रू वस्तीतील इमारतीमध्ये बुधवारी क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या देशमुख कुटुंबाला अखिलेश शुक्ला आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. विशेष म्हणजे ही मारहाण होत असताना अखिलेश शुक्लाकडून या मराठी कुटुंबाला त्यांच्या मराठी असल्याबद्दल आक्षेपार्ह विधानं वापरून हिणवण्यात आल्याची तक्रारही संबंधित कुटुंबीयांकडून करण्यात आली. त्यानंतर या घटने विरोधात स्थानिक परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.

गुरुवारी संध्याकाळी योगीधाम परिसरातील स्थानिक मराठी बांधव एकत्र आले आणि त्यांनी या अखिलेश शुक्लावर कडक कारवाईची मागणी केली. तसेच पोलिसांनी या प्रकरणी शुक्ला आणि त्याच्या सहकाऱ्यांना लवकरात लवकर अटक न केल्यास डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही या स्थानिक नागरिकांनी दिला होता. त्यानुसार योगीधाम परिसरातील स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी आज सकाळी कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी पोलीस प्रशासनालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत शुक्लाला जाणीवपूर्वक वाचवले जात असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच पोलिसांनी लावलेली कलमं आणि फिर्यादीला दिलेली वागणूक अत्यंत संशयास्पद असल्याचे सांगत या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर अटक करून हत्येच्या प्रयत्नाचे कलम लावण्याची आग्रही भूमिका मांडली. तसेच 24 तासाच्या आत मुख्य आरोपीला अटक झाली नाही तर योगीधाम परिसरात बंद पाडून सर्वजण रस्त्यावरती उतरू असा इशाराही या स्थानिक रहिवाशी आणि राजकीय नेत्यांनी या बैठकीत दिला.

या सर्व मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आणि प्रसिद्धी माध्यमांनी तिचे वृत्तांकन केल्यावर थेट नागपूर येथे सुरू असलेल्या राज्याच्या अधिवेशनामध्ये त्याचे पडसाद उमटले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित आरोपीवर कठोरात कठोर शासन करण्याची ग्वाही दिली. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये राहून अशा प्रकारचा महाराष्ट्र द्वेष करणाऱ्या प्रवृत्ती आणि त्यांचा माज अजिबात सहन केला जाणार नाही अशा कडक शब्दांमध्ये त्यांनी आपली भूमिका आणि या प्रकरणाची दिशा स्पष्ट केली. या घटनेतील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला हा महाराष्ट्र शासनाच्या एमटीडीसी विभागात कार्यरत असल्याचे निदर्शनास आले असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

दरम्यान राज्याच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच तापले. या प्रकरणी संबंधित आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांच्यामार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे सुतोवाच डीसीपी अतुल झेंडे यांनी केले. तसेच आरोपीलाही लवकरात लवकर पकडले जाईल असे सांगत संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अखिलेश शुक्लाला पोलिसांनी टिटवाळा परिसरातून ताब्यात घेतले. आणि दिवसभर सुरू असलेल्या या संपूर्ण घडामोडींवर पडदा पडला. मात्र महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी बांधवांच्या अस्मितेला डिवचणाऱ्या अशा आसुरी मनोवृत्तीना कायमस्वरुपी चाप लावण्याची नितांत गरज दिसत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा