मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोधली रिक्षा
डोंबिवली दि.2 डिसेंबर :
लग्न समारंभ आटोपून घरी परतणाऱ्या कुटुंबाची रिक्षात राहिलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग मानपाडा पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून त्या कुटुंबाला परत केली. मानपाडा पोलिसांनी अवघ्या तासाभरात हे दागिने शोधून परत केल्याने संबंधित कुटुंबियांनी मानपाडा पोलिसांचे आभार मानले आहेत.
डोंबिवली पूर्वेतील दावडी परिसरात राहणाऱ्या शोभा गायकवाड यांच्या मुलीच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी सर्व कुटुंबीय दादरला गेले होते. हा लग्न समारंभ आटोपून गायकवाड कुटुंबीय रात्री 9 च्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्टेशनहून रिक्षा करून आपल्या घरी आले. मात्र घरी गेल्यावर सोन्याच्या दागिन्यांची बॅग रिक्षातच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत रिक्षाचालक तिथून निघून गेला होता. त्यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाणे गाठत रिक्षात बॅग राहिल्याबाबत माहिती दिली.
मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वणवे यांच्या पथकाने तपास सुरू करत स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. यामध्ये पोलिसांना ही रिक्षा आढळून आली. या रिक्षाच्या हुडवर पांढऱ्या रंगाची पट्टी होती. रिक्षाचा नंबर आणि त्या पट्टीच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला.
सुरुवातीला रिक्षाचालकाने याबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दागिन्यांची बॅग पोलिसांच्या ताब्यात दिली आणि मानपाडा पोलिसांनी गायकवाड कुटुंबियांना त्यांचे दागिने परत केले.
मानपाडा पोलिसांनी अवघ्या तासाभरात ही सोन्याची बॅग शोधून काढल्याबद्दल संबंधित कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.