डोंबिवली दि.2 फेब्रुवारी :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक मनोज घरत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते घरत यांना शहराध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. विशेष म्हणजे ही नियुक्ती पुढील 1 वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली असून वर्षभरातील कामगिरी पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही पत्रात नमुद करण्यात आले आहे.
कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण कालपासून ढवळून निघाले आहे. आधी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ आज सकाळी मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनीही मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. या दोन्ही घडामोडींमुळे डोंबिवली शहरातील मनसेतील वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू पाटील यांनी आज मनसेच्या निवडक पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मनसे आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई, प्रकाश भोईर, हर्षल पाटील, राहुल कामत आदी पदाधिकारीही उपस्थित होते.
दरम्यान मनोज घरत हेदेखील पक्षाचा एक युवा आणि आक्रमक चेहरा म्हणून सर्वश्रुत असून यापूर्वीही त्यांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आगामी काळात असणाऱ्या केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणूका आणि पक्षातून दिग्गज नेत्यांची होणारी एगझिट पाहता मनसैनिकांमधील जोश आणि विश्वास कायम राखण्याचे प्रमूख आवाहन घरत यांच्यासमोर आहे.