कल्याण दि.18 ऑगस्ट :
कल्याणातील सर्वात जुन्या सार्वजनिक गणेशोत्सवापैकी एक असलेला सुप्रसिद्ध सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सव आपले १३०वे वर्ष साजरे करत आहे. यंदाच्या म्हणजेच सन २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांसाठी या गणेशोत्सवाचे व्यवस्थापन हे श्रीराम सेवा मंडळाकडे देण्यात आले असून या गणेशोत्सवाच्या प्रथेप्रमाणे शनिवारी १७ ऑगस्ट २०२४ रोजी मंडप पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.(Mandap pujan of kalyans historical subhedar wada ganeshotsav)
सुभेदार वाड्यातील हा सार्वजनिक गणेशोत्सव हा कल्याणातील एक अतिशय सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक उत्सव आहे. या सार्वजनिक गणेशोत्सवाला तब्बल सव्वाशे वर्षांहून अधिक काळाची परंपरा आहे. कल्याणातील विविध सामाजिक संस्थांना दर दोन वर्षांनी या ऐतिहासिक गणेशोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात येते. त्यानुसार यंदा कल्याणमधीलच स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या श्रीराम सेवा मंडळाकडे त्याचे आयोजनपद सोपवण्यात आले आहे.
तर या गणेशोत्सवाच्या प्रथेनुसार शनिवारी विधिवत मंडप पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला श्रीराम सेवा मंडळाच्या सर्व सभासदांसह सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदार वाडा कल्याणचे संचालक सुरेश पटवर्धन आणि भालचंद्र जोशीही उपस्थित होते.
यावेळी बोलताना संचालक सुरेश पटवर्धन यांनी गेल्या या ऐतिहासिक गणेशोत्सवाच्या १३० वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. तर श्रीराम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंपी यांनी सर्व सभासदांशी संवाद साधून मंडळ स्थापनेमागचा उद्देश आणि त्याच्या वाटचालीबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमामध्ये मंडप कॉन्ट्रॅक्टर, पूजा सांगणारे गुरूजी, मंडळाचे मूर्तिकार अशा सर्वांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव स्वानंद गोगटे यांनी केले.