Home ठळक बातम्या गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा अन्यथा केडीएमसी प्रशासनाला आमच्या पद्धतीने धडा शिकवू –...

गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा अन्यथा केडीएमसी प्रशासनाला आमच्या पद्धतीने धडा शिकवू – आमदार विश्वनाथ भोईर

प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मधील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमीपूजन

कल्याण दि.1 सप्टेंबर :
रस्त्यांवरील खड्डे भरण्यात केडीएमसी प्रशासन सपशेल अपयशी ठरली असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आमच्या पद्धतीने धडा शिकवू असा थेट इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी इशारा दिला आहे. तसेच खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णपणे केडीएमसी आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दांत आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

एमएमआरडीएच्या माध्यमातून नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये मंजूर निधीतून मुख्य रत्स्यांचे काँक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना त्यांनी खड्ड्यांबाबत केडीएमसी प्रशासनाला धारेवर धरले.

तर त्याला संपूर्णपणे केडीएमसी आयुक्त जबाबदार…
गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच शिल्लक असून आजपासून कल्याणातील मानाच्या गणपतींचे आगमन सुरू झाले आहे. मात्र अद्यापही केडीएमसी प्रशासनाकडून खड्डे भरण्यासाठी कोणतीही कार्यवाही केली जात नाहीये. काही दिवसांपूर्वी आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली असताना केडीएमसीने खड्डे भरण्याचे काम केले पाहिजे होते. परंतु शहरातील खड्डे भरण्यासाठी केडीएमसीचे कोणतेही नियोजन नाहीये की कुठलीही तयारी नसल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. तर या खड्ड्यांमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले असून त्यामुळे एखादी दुर्घटना घडली आणि शांत असणारे शहरातील वातावरण बिघडून विनाकारण गालबोट लागल्यास त्याला संपूर्णपणे केडीएमसी आयुक्त जबाबदार असतील अशा शब्दांत आमदार भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने केडीएमसी प्रशासनाला धडा शिकवू असा थेट इशाराही भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.


कल्याण पश्चिमेतील रस्त्यांसाठी 50 कोटी रुपयांचा विकासनिधी…
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी कल्याणातील रस्त्यांचे काँक्रिटीकरणासाठी 50 कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही विकासकामे सुरू करता येत नव्हती. त्याच अनुषंगाने आज गांधारी आणि रौनक सिटी येथील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरणाच्या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. तर कल्याण पश्चिमेतील उर्वरित मुख्य रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम गणेशोत्सवानंतर सुरू होणार असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली.

या भूमीपूजन समारंभाला स्थानिक लोकप्रतिनिधी प्रभूनाथ भोईर, जयवंत भोईर, वैशाली भोईर यांच्यासह शिवसेना उप शहर प्रमूख सुनिल खारुक, रामदास कारभारी, डॉ. धीरज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी – कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा