कल्याण दि.25 डिसेंबर :
संपूर्ण कल्याण शहराला हादरवून सोडलेल्या अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या पत्नीलाही याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती कल्याणचे डी सी पी अतुल झेंडे यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली आहे. तर या घटनेविरोधात संतप्त नागरिकांनी या आरोपीला फाशीची देण्याची मागणी केली आहे. (Main accused arrested in Kalyan minor girl’s murder case; Encounter like Akshay Shinde, angry citizens demand)
कल्याण पूर्वेतील 13 वर्षीय या अल्पवयीन मुलीची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेविरोधात स्थानिक नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करत आज सकाळी मुक मोर्चा काढला होता. ज्यामध्ये आरोपीला तातडीने अटक करण्यासह फाशीची शिक्षा देण्याची मागणी या नागरिकांनी केली.
तर कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यांनीही या घटनेतील आरोपीला अक्षय शिंदेप्रमाणे अतिशय कठोर शिक्षा करण्याची मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले आहे.
एकीकडे संतप्त नागरिक ही मुक निदर्शने करत असतानाच कल्याण पोलीसांनी सहा पथकं या घटनेतील मुख्य आरोपी विशाल गवळीच्या शोधासाठी रवाना केली होती. अखेर या पथकांनी सीसीटीव्हीद्वारे बुलढाणा जिल्ह्यातून विशालच्या मुसक्या आवळल्याची माहिती डी सी पी अतुल झेंडे यांनी दिली आहे. पोलीसांनी ओळखू नये आणि त्यांना गुंगारा देता यावा यासाठी विशाल आपली वेशभूषा बदलत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. तसेच या प्रकरणात त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी अटक केली आहे. विशाल गवळीवर याआधीही पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचेही डी सी पी अतुल झेंडे यांनी सांगितले.