
कल्याण दि. 14 एप्रिल :
केंद्रीय राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी कल्याण पश्चिम भागातील विविध रहिवाशी सोसायट्यांमधील नागरिकांबरोबर आज संवाद साधला. त्याला रहिवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहरांमध्ये रहिवाशी सोसायट्यांमध्ये पोचून थेट संवाद साधला जात आहे. त्यानुसार कल्याण पश्चिममधील खडकपाडा, चिकणघर परिसरातील वाधवा मिडोज, लोटस टॉवर, प्रफुल्ल पॅराडाईज, गगनगिरी, त्रिवेणी विहार, आलिशान पार्क, भाग्योदय पार्क आणि जय भीम नगरमधील रहिवाशांची भेट घेतली. सोसायटीचे चेअरमन व पदाधिकाऱ्यांबरोबरही चर्चा केली.
केंद्र सरकारने १० वर्षांत केलेल्या कार्याची माहिती दिल्यानंतर विकसित भारत घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे आवाहन केले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटी योजनेतून उभारलेले सिटी पार्क, रेल्वे स्टेशनबाहेरील पार्किंग प्लाझा, वेगाने उभारला जात असलेला सॅटीस पूल, रिंग रोड, पाणीपुरवठा योजना, कॉंक्रीट रस्ते आदींची माहिती नागरिकांना दिली.
या वेळी माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, जयवंत भोईर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.