कल्याण/भांडुप 9 जानेवारी :
महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरू केली आहे. (Mahavitran’s Lucky Digital Customer Scheme; Opportunity to get rewards by paying electricity bills online)
सर्व लघुदाब वीज ग्राहक ठरणार पात्र…
या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग 3 किंवा त्यापेक्षा अधिक वीजबिले भरून ग्राहकांना योजनेच्या लाभाची संधी साधता येणार आहे. कल्याण आणि भांडुप परिमंडलातील जवळपास ८० टक्के ग्राहक डिजिटल माध्यमातून ऑनलाईन वीजबिल भरतात. उर्वरित २० टक्के ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.
केवळ या ग्राहकांना मिळणार ही बक्षीसं…
१ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा ऑनलाईन पद्धतीने केलेला नाही, अशा ग्राहकांसाठी ही योजना आहे. लकी ड्रॉ व्दारे स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ग्राहकांनी ऑनलाईन पध्दतीने वीजबिल भरून लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
रांगेत उभे राहून वेळ, श्रम आणि पैशांचा अपव्यय करण्याऐवजी महावितरणच्या उपलब्ध संकेतस्थळ, मोबाईल ॲप व इतर सुविधांमार्फत ऑनलाईन वीजबिल भरून ग्राहक ०.२५ टक्क्यांची सवलतही मिळवू शकतात.
विजेत्यांना मिळणार ही बक्षिसे..
महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे आणि जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रॉ मध्ये पाच विजेत्यांना स्मार्ट फोन – स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत.
या योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीनपेक्षा अधिक महिने वीजबिल भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.