
कल्याण दि.23 ऑगस्ट :
बदलापूरमध्ये घडलेल्या चिमुकल्यांवरील अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीतर्फे पुकारण्यात आलेला उद्याचा “महाराष्ट्र बंद” मागे घेण्यात आला आहे. त्याऐवजी आता केवळ काळे झेंडे आणि तोंडाला पट्टी बांधून निदर्शने करण्यात येणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
बदलापूरमधील घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर झालेल्या सुनावणीमध्ये हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असून राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नसल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलं.
त्यापाठोपाठ काँग्रेसनेही महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. आणि मग त्यांच्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मग पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले. या बंदऐवजी राज्यात विविध ठिकाणी काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात येणार असल्याचंही महाविकास आघाडीतर्फे स्पष्ट करण्यात आले.