Home क्राइम वॉच 6 महिन्याच्या चिमुकल्याला विकण्यासाठी चोरून नेणाऱ्या 5 जणांना महात्मा फुले पोलीसांकडून अटक

6 महिन्याच्या चिमुकल्याला विकण्यासाठी चोरून नेणाऱ्या 5 जणांना महात्मा फुले पोलीसांकडून अटक

 

कल्याण दि.10 जून :
विक्री करण्यासाठी 6 महिन्यांच्या चिमुरड्याला त्याच्या आईच्या कुशीतून चोरून नेणाऱ्या 5 जणांना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे अपहरण झालेले हे बाळ 48 तासांच्या आत आईला परत मिळवून दिल्याबद्दल महात्मा फुले पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे. (Mahatma Phule police arrest 5 people for stealing 6-month-old baby)

मूळ बिहार येथे राहणाऱ्या सुनिता राजकुमार नाथ (30) या फिरस्त्या महिलेच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. कल्याण पश्चिमेच्या स्टेशन रोडजवळील महंमद अली चौकात शिवमंदिराच्या बाजूकडील दुकानाबाहेर सुनिता आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन शनिवारी 5 जून रोजी रात्रीच्या सुमारास झोपली होती. मध्यरात्री 1 च्या सुमारास तिला जाग आली असता तिला आपले बाळ नसल्याचे आढळून आले. तिने आपल्या बाळाला सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला. परंतू तो कुठेही आढळून न आल्याने अखेर तिने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

मग पोलिसांनीही तात्काळ सूत्र हलवत बेपत्ता बाळाला शोधण्याची कामगिरी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे, प्रकाश पाटील, फौजदार संजय जगताप, सहाय्यक फौजदार जे. के शिंदे यांच्यावर सोपवली. या पथकाने वेगाने तपासाची चक्र हलवत जिवा बेपत्ता झालेल्या परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. आणि त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 48 तासांच्या आत पाचही आरोपींना बेड्या ठोकत चिमुरड्याला शोधून काढले.

विशाल चंद्रकांत त्र्यंबके (20, रा. आटाळी-आंबिवली), कुणाल विष्या कोट (23 रा. साई राणा चाळ, दिवा-पूर्व), आरती कुणाल कोट (22, दिवा), हिना फरहान माजीद (26, रा. कोटर गेट मशिदजवळ, भिवंडी आणि फरहान अब्दुल रझाक माजोद (38, रा. भिवंडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
यातील कुणाल आणि आरती कोट, तसेच हिना आणि फरहान माजीद हे पती-पत्नी आहेत. कुणाल आणि आरती कोट कोणताही काम-धंदा करत नसून 1 लाख रुपयांना विकण्याकरता त्यांनी हे बाळ पळवल्याची प्राथमिक माहिती आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा