
कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांची संकल्पना
कल्याण दि.13 फेब्रुवारी :
कल्याणच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाने माघी गणेशोत्सवासाठी यंदा अतिभव्य अशी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून हा प्रभू श्रीराम मंदिराचा अप्रतिम असा देखावा सादर करण्यात आला आहे. आजच्या अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पांचा वाजत गाजत आगमन सोहळा संपन्न झाला.
कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा या मंडळाच्या माघी गणेशोत्सवाचे 30 वे वर्ष असून अयोध्येत प्रभू श्रीरामलल्ला अतिसुंदर मंदिरामध्ये विराजमान झाले आहेत. अनेक भक्तांची इच्छा असूनही त्यांना अयोध्येला जाणे शक्य होत नसल्याने शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळाने ही श्रीराम मंदिर प्रतिकृती साकारली आहे.
कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात गेल्या अनेक दिवसांपासून या भव्य मंदिर प्रतिकृतीचे काम सुरू होते. ही प्रतिकृती 40 फूट लांब, 90 फूट रुंद आणि 70 फूट उंच इतकी भव्य आहे. ज्याठिकाणी भक्तांना थेट आतमध्ये प्रवेश करून या मंदिराची रचनाही पाहता येत आहे. तसेच स्वर्गीय विशाल भोईर चौकापासून ते आत्माराम भोईर चौकापर्यंत अतिशय आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे.
गेल्या 30 वर्षांपासून अतिशय भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणारा हा बहुधा पहिलाच गणेशोस्तव असून धर्मवीर आनंद दिघे हे देखील दरवर्षी याठिकाणी दर्शनासाठी यायचे अशी आठवण आयोजक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी प्रभूनाथ भोईर यांनी यावेळी सांगितली. तसेच कल्याणसह आसपासच्या परिसरातील भाविकांनी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी तसेच ही अतिभव्य अशी मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी नक्की यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळाने येथील स्वर्गीय विशाल भोईर चौकापासून गणपती बाप्पांची वाजत गाजत मिरवणूक काढली होती.
यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, स्थानिक लोकप्रतिनिधी जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, युवानेते वैभव विश्वनाथ भोईर यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.