
कल्याण दि.11 जानेवारी :
कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी परिसरात असलेल्या सत्यम ऑर्केस्ट्रा बारमुळे होणाऱ्या त्रासाविरोधात संतप्त झालेल्या स्थानिक महिलांनी थेट बारवर धडक दिल्याचा प्रकार सायंकाळच्या सुमारास घडला आहे.संतापलेल्या महिलांनी भरवस्तीत असलेला हा बार बंद करण्याची मागणी करत बार बाहेर एकच गोंधळ घातला . दरम्यान पोलिसांनी याप्रकरणात बार मालकाला समज दिल्यानंतर या महिलांनी आंदोलन मागे घेतले असले तरी हा बार बंद करण्याची मागणी केली आहे .
कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात हा ऑर्केस्ट्रा बार असून याठिकाणी संध्याकाळी आणि रात्री चालणारे कर्णकर्कश्श म्युजिक तसेच बारबालांची येजा ,भर रस्त्यात सुरू असलेले अश्लील हाव भाव यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले होते. विशेषतः स्थानिक महिलांना तर या ऑर्केस्ट्रा बारमुळे दररोज माना खाली घालून परिसरात वावरावे लागायचे. या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर आज परिसरातील संतप्त महिलांनी या बारवर धडक देत तो बंद करण्याची मागणी लावून धरली. काही काळ संतप्त महिलांचा हा गोंधळ चालल्यानंतर अखेर स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करत बार चालकाला कडक शब्दांत समज दिली.