भाजपच्या शिष्टमंडळाने कल्याण तहसिल कार्यालयाला दिले निवेदन
कल्याण दि.12 नोव्हेंबर :
केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल उत्पादन कर कमी करून ज्याप्रमाणे नागरिकांना दिलासा दिलाय त्याप्रमाणे आता राज्य सरकारनेही पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट आणि अन्य कर तातडीने कमी करण्याची मागणी कल्याण जिल्हा भाजपतर्फे करण्यात आली आहे. याबाबत कल्याण जिल्हा भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांची कपात केली आहे. त्यामूळे पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळाल्याचे जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी सांगितले. त्याप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारचे अनुकरण करत व्हॅट आणि अन्य कर तातडीने कमी करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पेट्रोल – डिझेल दरवाढीविरोधात सातत्याने आंदोलने केली होती. त्यामुळे आता केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर आघाडी सरकारने इंधनावर लावलेले कर कमी करण्याची सामान्य माणसाची अपेक्षा असल्याचे भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे ,मनोज राय, उपाध्यक्ष नाना सूर्यवंशी, महिलाध्यक्ष रेखा चौधरी, युवाध्यक्ष मिहीर देसाई, कल्याण पश्चिम महिलाध्यक्ष रेखा म्हात्रे, संतोष शिंगोळे, मोहणे टिटवाळा मंडळ सरचिटणीस, राजेंद्र चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.