रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेत मांडल्या दिवा स्टेशनवरील समस्या
डोंबिवली दि. 4 ऑगस्ट :
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. परंतु दिवा जंक्शन येथून कोकणवासियांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. आमदार राजू पाटील यांनी आज रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेत दिवा स्थानकातील समस्या मांडण्यासह ही महत्वाची मागणी केली.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या ही लक्षणीय आहे. वास्तविक रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग आदी गोव्यापर्यत राहणारा मुंबईकर दिवा, कल्याण,डोंबिवली, अंबरनाथ,नेवाळी ,उल्हासनगर, बदलापूरसह अगदी कसारा, खोपोलीपर्यंत नोकरी निमित्त स्थायिक झाला आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात चाकरमानी आपल्या आपल्या कुंटुबासह मूळ गावी जाऊन गणेशोत्सव साजरा करत असतो. गणेशोत्सव आल्यावर दिवा जंक्शनहून कोकणसाठी गाड्या सोडण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून घोषणा करण्यात येते. परंतु त्यावेळी प्रवाशांमध्ये गोंधळ उडून नियोजन करण्यात अडचणी येत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने घोषणा केल्यास कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना नियोजन करणे सोपे होईल अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
आमदार पाटील यांच्या मागणीला रेल्वे प्रशासनाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान या महत्वाच्या मागणीसोबतच आमदार राजू पाटील यांनी रेल्वेचे महाव्यस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्यासमोर दिवा स्थानकातील समस्या मांडल्या. ज्यामध्ये प्रामुख्याने दिवा जंक्शन येथून गणपती स्पेशल ट्रेन सुरू करणे, दिवा पनवेल -वसई रोड -पनवेल -रोहा रेल्वे मार्गावरील पॅसेंजरचे बंद केलेले रेल्वे थांबे सुरू करणे, रेल्वे स्थानकावरील तिकीट घर, शौचालय आणि शेड तातडीने कार्यान्वित करणे, दिवा स्टेशन मास्तर हद्द विभाजन, दिवा रेल्वे स्टेशन परिसरात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारणे, दिवा रेल्वे स्थानकात रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करणे तसेच दिवा जंक्शन येथे हमाल यांची व्यवस्था करणे, आगासन – दातिवली रेल्वे फाटक रस्ता डांबरीकरण, लोकग्राम पादचारी पूल आदी विषयांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तर रेल्वे महाव्यवस्थापकांनीही या सर्व प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद देत त्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याचे राजू पाटील म्हणाले.
यावेळी मनसे रेल्वे सेनेचे अध्यक्ष जितू पाटील, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील , दिवा मनसे अध्यक्ष तुषार पाटील आणि मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पाणी पुरवठ्याचा प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावा..
दिवा पूर्वेकडून पश्चिमेकडे ठाणे महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा करण्यासाठी पुश थ्रू करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. मात्र यावर अद्याप रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. या बाबत रेल्वे विभागाने ठाणे मनपाला तातडीने परवानगी द्यावी. अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी केली.