स्थानिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे प्रशासनाचे आवाहन
कल्याण दि. ५ जुलै :
कालपासून कल्याण डोंबिवली परिसराला मुसळधार पावसाने झोडपले असून सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. तर कल्याण पूर्वेच्या कचोरे गावातील हनुमान नगर टेकडीवरून दरड कोसळली. मात्र याठिकाणी बांधण्यात आलेल्या संरक्षक लोखंडी खांबांमुळे मोठी दुर्घटना टळली.
काल म्हणजेच सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. काल सकाळपासून कल्याण आणि परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. परिणामी कल्याण पूर्वेतील कचोरे गावातील टेकडीवरून संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठ मोठे दगड आणि मातीचा ढिगारा खाली आला. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी रेखा राजन चौधरी यांच्या पाठपुराव्याने बांधण्यात आलेल्या संरक्षक लोखंडी खांबांमुळे हे दगड आणि मातीचा ढिगारा खाली असणाऱ्या घरापर्यंत पोहचू शकला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती अशी माहिती स्थानिकांनी दिली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कल्याण तहसील कार्यालय आणि केडीएमसी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पुन्हा असाच प्रकार घडण्याची शक्यता गृहीत धरून स्थानिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आवाहन केले.