कल्याण दि.5 सप्टेंबर :
दिवसागणिक तंत्रज्ञानात जशी प्रगती होत आहे, तसतसे त्या माध्यमातून लोकांना फसवायचे प्रकारही वाढत चालले आहेत. कल्याणात सध्या अशाच प्रकारच्या गुगल पे च्या नावाखाली महिलांना गंडा घालण्याचे कॉल अनेकांना येत आहेत. ज्याद्वारे लोकांना गोंधळात टाकून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Ladies beware of fake calls in the name of “Google Pay”; Scam attempts are underway in Kalyan)
गेल्या दोन तीन दिवसांपासून कल्याणातील अनेकांना असे बोगस कॉल येत आहेत. आणि त्याद्वारे खोटे सांगून आणि गुगल पे अमाऊंटचे खोटे स्क्रीनशॉट शेअर करून जास्तीचे पैसे आल्याची बतावणी करून लोकांना फसवले जात असल्याची माहिती फोन आलेल्या व्यक्तींनी एलएनएनशी बोलताना दिली आहे.
अशी केली जातेय लोकांची फसवणूक…
संबंधित महिला किंवा मुलींना फोनद्वारे “मी तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा मित्र आहे. तुमच्या पतीकडून मी पैसे घेतले होते. ते तुम्हाला गुगल पे वर पाठवतो, असे सांगून संबंधित महिलेला व्हॉट्स अपवर पैसे पाठवल्याचे खोटे स्क्रीनशॉट शेअर केले जातात. आणि मग माझ्याकडून तुम्हाला चुकून जास्त पैसे आले आहेत, तुम्ही मला ते या नंबरवर ते जास्तीचे पैसे परत करा अशी बतावणी करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कल्याणातील अनेकांना अशा प्रकारचे बोगस फोन आले असून काही जणं त्यात फसले गेले आहेत. तर काही जणांनी प्रसंगावधान राखून आणि थोडेसे डोके चालवून आपली फसवणूक टाळली आहे.