आमदार विश्वनाथ भोईर घेणार 3 हजार लाडक्या बहिणींची भेट
कल्याण दि.14 सप्टेंबर :
अतिशय लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेतील लाभार्थी महिलांची भेट घेण्याचे अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केले असून पक्षाच्या खासदार आणि आमदारांनाही आपापल्या मतदारसंघात ते राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनीही आपल्या मतदारसंघामध्ये आजपासून या अभियानाला जोरदार प्रारंभ केला आहे. येत्या काही दिवसांत आमदार भोईर हे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील तब्बल 3 हजार लाडक्या बहीणींशी संवाद साधणार आहेत. (Ladaki Bahin family meeting Campaign started in Kalyan West Assembly Constituency)
महायुतीच्या सरकारची सर्वाधिक यशस्वी आणि महिलांमध्ये अतिशय पसंतीची ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची मुदत सध्या सप्टेंबर अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यभरात आताच्या घडीला अडीच कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून सप्टेंबरनंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अशा या योजनेतील सर्व लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेगाप्लॅन तयार केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांसह प्रत्येक मंत्री,आमदार, खासदार, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या लाडक्या बहिणींची भेट घेण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आजपासून मतदारसंघातील लाभार्थी महिलांची भेट घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
आमदार विश्वनाथ भोईर आपल्या मतदारसंघातील 3000 लाभार्थ्यांना भेटणार आहेत आज त्यांनी कल्याण पश्चिम येथील आधारवाडी परिसरातील असलेल्या सात कॉम्प्लेक्स मध्ये जाऊन लाभार्थ्यांची भेट घेतली.
सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबिय अत्यंत खूष…- आमदार विश्वनाथ भोईर
मुख्यमंत्री महोदय प्रत्येक बहिणीच्या घरी स्वत: जाऊ शकत नसल्याने आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी बहिणीच्या घरी जाऊन या योजनेमुळे त्या आनंदी आहेत का? हे पाहावयाचे आहे. मुळातच या योजनेमुळे सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबिय अत्यंत खूष असल्याचे आपण दिलेल्या भेटीमध्ये जाणवल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतून मिळणाऱ्या दिड हजार रुपयांमुळे घरखर्चाला नवऱ्याकडे हात पसरण्याची गरज नाही आणि यापेक्षा त्यावरून होणारी कटकट थांबल्याची भावनाही या महिलांनी आपल्याकडे व्यक्त केल्याचे भोईर म्हणाले.
मुख्यमंंत्री कौतूकास पात्र, राज्यातील बहिणींसाठी चांगला निर्णय घेतला…
मुख्यमंंत्री कौतूकास पात्र आहे. राज्यातील बहिणींविषयी त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे. या योजनेतून मिळालेया पैसाचा वापर घर खर्चासाठी केला जाऊ शकतो असे एका लाडक्या बहिणीने सांगितले. आमदार आमच्या भेटीसाठी आले. त्यांनी खूप चांगली योजना सुरु केली आहे. ही योजना अशीच पुढे चालू राहावी.
मुख्यमंत्र्यांच्या योजनेचा आम्हाला मोठा आधार…
मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार असून यामुळे महिला आपल्या पायावर उभ्या राहू शकतात. महिन्याला दीड हजार देणे ही फार महत्वाचे आहे. त्यामुळे आम्हाला मोठा आधार झाला आहे असे एका लाभार्थी महिलेने सांगितले.