कल्याण दि.25 जुलै :
दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये टिटवाळ्यातील रिजेन्सी परिसरात राहणाऱ्या युवकाला पोहायला उतरण्याचे धाडस चांगलेच अंगलट आले. तब्बल अडीच तास पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर वाहत जाणाऱ्या या युवकाचा अटाळी गावातील कोळी बांधवांनी जीव वाचवला. होडीच्या मदतीने कोळी बांधवानी या तरुणाला सुरक्षित बाहेर काढले.
टिटवाळा रिजेन्सी परिसरात राहणारा युवक हा युवक 22 जुलैला सकाळी 11 वाजता पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त होता की तो त्यासोबत वाहू लागला आणि काळू नदीत पोहोचला. अशाप्रकारे हा युवक तब्बल अड्डीच तासानंतर अटाळी गावाजवळील काळू नदीपत्रात पोहोचला. याठिकाणी वाहून जात असताना अटाळी गावातील स्थानिक कोळी बांधव विवेक कोनकर आणि शैलेश पाटील यांच्या निदर्शनास आले. या दोघांनी त्याला आपल्या होडीच्या मदतीने पुराच्या पाण्यातुन बाहेर काढत जीवदान दिले. पाण्याबाहेर आल्यानंतर या तरुणाला बोलताही येत नव्हते. त्यामूळे कोळी बांधवांनी त्याला पोलिसांकडे सर्पुद केले.
विशेष म्हणजे या कोळी बांधवाचे घर पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडाले असतानाही या परिस्थितीत त्यांनी तरुणाचा जीव वाचवल्याने दोघांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच ग्रामस्थ मंडळ अटाळी-कोळीवाडातर्फे या दोघाही तरुणांचा सत्कार करण्यात आला.