कल्याण लोकसभा मतदारसंघात 5 सुसज्ज कार्डिएक रुग्णवाहिकांचे लोकार्पण
कल्याण – डोंबिवली दि.4 फेब्रुवारी :
ज्ञानाची तुलना ही केवळ ज्ञानाशीच होऊ शकते असे प्रतिपादन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत केले. खासदार डॉ. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली शिवसेना शाखा आणि साहित्ययात्रा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमात ग्रंथतुलेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र खासदार डॉ. शिंदे यांनी त्याला नम्रपणे नकार देत ज्ञानाची तुलना ही केवळ ज्ञानाशीच होऊ शकते असे सांगितले. आणि पुस्तकं, ग्रंथांची तुला पुस्तक , ग्रंथांनीच करून घेतली.
डोंबिवली शहराची सांस्कृतिक आणि वैचारिक भूक अतिशय मोठी आहे. त्यामूळे या पुस्तक प्रदर्शनाला डोंबिवलीकर उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असा विश्वासही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ज्येष्ठ पत्रकार गिरीश त्रिवेदी, चंद्रशेखर भुयार, प्रशांत मोरे आणि सागर नरेकर यांच्या साहित्ययात्रा संस्थेच्या माध्यमातून हे पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
कल्याण लोकसभेसाठी सुसज्ज कार्डिएक रुग्णवाहिकांचे लोकापर्ण…
विकासकामांचा कॉपीराईट केवळ शिवसेनेकडे आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रचंड मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू असून पुढील 2 वर्षांत इथल्या वाहतुकीची समस्या दूर होईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी 5 सुसज्ज रुग्णवाहिकांचें लोकार्पण कल्याण पूर्वेतील चक्कीनाका इथल्या कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी खासदार शिंदे यांनी मतदारसंघात सुरू असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांची यादी सांगत विरोधकांचाही आपल्या शैलीत समाचार घेतला.
आम्ही इतर पक्षांसारखे निवडणुका आल्या म्हणून काम करत नाही. निवडणूक असली नसली तरीही आमची विकासकामे आणि लोकोपयोगी कामे सुरूच असतात. इतरांप्रमाणे निवडणुका झाल्या की कार्यालयं बंद करून जाणाऱ्यातील आम्ही नसल्याचा टोलाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी लगावला.
दरम्यान लोकार्पण केलेल्या या सुसज्ज रुग्णवाहिका या कल्याण लोकसभा मतदारसंघातील कळवा-मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर आणि अंबरनाथ अशा प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत असणार आहेत.
या लोकार्पण सोहळ्याला गोपाळ लांडगे, आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक निलेश शिंदे, मल्लेश शेट्टी, हर्षवर्धन पालांडे यांच्यासह विविध शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. तर वाढदिवसानिमित्त खासदार डॉ. शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील विविध मान्यवरांसह सामान्य नागरिकांची मोठी रीघ लागल्याचेही दिसून आले.