कल्याण दि.३ ऑक्टोबर :
निर्जन स्थळी गाड्या पार्क असल्याचा फायदा घेवून बाईक आणि रिक्षा चोरून नेणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना खडकपाडा पोलिसांनी गजाआड केले आहे. तसेच या दोघांकडून पोलिसांनी १२ गुन्हे उघड करत १० गाड्याही हस्तगत केल्या आहेत.
राहुल अशोकसिंग परिहार वय २४ आणि करण बिरबल राजभर वय १९ वर्षे राहणार आंबिवली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खडकपाडा पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण १० बाईक, रिक्षा आणि एक मोबाईल असा एकूण सव्वा ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एसीपी उमेश माने पाटील यांनी दिली.
निर्जनस्थळी पार्क केलेल्या वाहनांवर नजर ठेवून हे चोरटे संधीचा फायदा घेत रिक्षा आणि मोटरसायकलचे हॅण्डल लॉक तोडून गाड्या चोरून न्यायचे. कल्याण आणि आसपासच्या परिसरात मोटरसायकली आणि रिक्षा चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने परिमंडळ ३ पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी विशेष तपास मोहीम सुरु केली आहे. त्यानुसार खडकपाडा पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने या चोरट्यांना बेड्या ठोकल्या. या दोघा आरोपींकडे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये करणकडून ६ मोटरसायकल, एक मोबाईल तर राहुलकडून ४ मोटरसायकली आणि एक रिक्षा असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ठाणे, कल्याण, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर, टिटवाळा आदी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झीने, नंदकुमार केंचे, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आंधळे, अनिल गायकवाड, तपास पथकांचे अंमलदार सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मधुकर दाभाडे, जितेंद्र ठोके, संजय चव्हाण, पोलीस हवालदार नवनाथ डोंगरे, अशोक पवार, गोपाळ राजपूत, सुनिल पवार, सदाशिव देवरे, राजू लोखंडे, बिजू शेले, पोलीस नाईक योगेश बुधकर, पोलीस शिपाई राहुल शिंदे, सूरज खंडाळे, दिपक थोरात, विशाल राठोड, अनंत देसले, धूळगंड, येणारे, मुपडे आदींच्या पथकाने केली.