कल्याण दि. १५ सप्टेंबर :
कल्याण डोंबिवली महापालिकेचे ट्विटर अकाउंट आज सकाळी एका अज्ञाताकडून हॅक करण्यात आल्याने महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. हे हॅण्डल हॅक करत संबंधित व्यक्तीने बीटकॉइनशी संबंधित अनेक मेसेज एका मागोमाग एक अपलोड केलेले पाहायला मिळाले.
कोवीड काळात एकाच वेळी अनेक लोकांशी संपर्क साधण्याच्या उद्देशाने केडीएमसीने इतक्या वर्षांत पहिल्यांदा सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास सुरुवात केली. पूर्वी केवळ वेबसाईट आणि तेही अत्यंत मर्यादित स्वरूपात असणाऱ्या केडीएमसीने मग फेसबूक, इंस्टाग्राम आणि फेसबूक पेजद्वारे लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. आणि कोवीड काळात कल्याण डोंबिवलीतील नागरिक सातत्याने त्याद्वारे माहितीची देवाण घेवाणीचे हे सर्व प्लॅटफॉर्म प्रमूख स्त्रोत बनले.
त्यापैकी एक असणारे केडीएमसीचे ट्विटर हॅण्डल आज सकाळी अज्ञात व्यक्तीने हॅक करत बीट कॉइन संबंधित मेसेज पोस्ट करण्यास सुरुवात केली. अवघ्या काही मिनिटांत या व्यक्तीने सुमारे शंभरच्या आसपास मेसेज पोस्ट केल्याने सर्वांचा एकच गोंधळ उडाला. दरम्यान ही बाब लक्षात येताच केडीएमसीचे सोशल मिडियाचे काम पाहणाऱ्या संबंधित खासगी व्यक्तीने केडीएमसी अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब घातली.
प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेत हे ट्विटर हँडल अवघ्या काही तासात रि-स्टोर केले. आणि हॅकर्सने केडीएमसीच्या या ट्विटर अकाउंटवरून तब्बल केलेले ट्विट तातडीने डिलीट करण्यात आल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. तसेच याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सायबर क्राईमच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.