कल्याण – डोंबिवली दि.17 डिसेंबर :
गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आणि चर्चेत असणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पूर्णपणे निकाली काढण्यासाठी केडीएमसीने कंबर कसली आहे. येत्या 3 महिन्यात कल्याण डोंबिवलीतील सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केला आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी केडीएमसी मुख्यालयात वरिष्ठ पोलीस, महावितरण आणि केडीएमसी अधिकाऱ्यांची बैठक झाली.
कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा हा गेल्या दशकभरापासून गाजतोय. या मुद्द्यावर उच्च न्यायालयानेही वारंवार केडीएमसीचे कान उपटले आहेत. मात्र त्यानंतरही कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांना रोखण्यात केडीएमसी प्रशासनाला अद्याप यश आलेले नाहीये. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबत घेतलेल्या निर्णयाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानूसार या सर्व अनधिकृत बांधकामांवर पुढील 3 महिन्यात कारवाई केली जाईल. येत्या आठवड्यापासून ही कारवाई सुरू होणार असून इमारत तोडण्यासाठी येणारा सर्व खर्च संबंधित बांधकामधारकाकडून वसूल केला जाणार आहे. त्याचसोबत त्या व्यक्तीच्या नावे केडीएमसीमध्ये नोंद असणाऱ्या प्रॉपर्टीवरही बोजा लावण्यात येणार आहे. या दंडात्मक करवाईसोबतच यापूर्वी दाखल असणाऱ्या एमआरटीपी केसेसवरही तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. सूर्यवंशी यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले. तर नव्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवरही एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्व प्रभाग समित्यांच्या सहाय्यक आयुक्तांना दिले. केडीएमसीने यापूर्वीच अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा बंद केला असून महावितरणनेही कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा न करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली आहे. यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिपक पाटील यांच्यासह केडीएमसीचे अनेक अधिकारी उपस्थित होते.
इतक्या वर्षांपासून भिजत घोंगडे असणाऱ्या या गंभीर प्रश्नाबाबत केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतलेली ही कठोर भूमिका नक्कीच स्वागतार्ह आहे. या निर्णयाचे कल्याण डोंबिवलीकरांना दूरगामी चांगलेच परिणाम पाहायला मिळतील यात वाद नाही. परंतु अनधिकृत बांधकामांवरील कारवाईनंतर त्यांना पाठीशी घातलेल्या आणि घालणाऱ्या केडीएमसी अधिकाऱ्यांवरही केडीएमसी आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारणे अपेक्षित आहे. तरच एवढ्या वर्षांपासून कल्याण डोंबिवलीला लागलेला काळा डाग पुसला जाईल.
साहेबांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. पण कारवाई होईल की नाही यात शंका आहे. यात जर नागरिकांनी पण पुढाकार घेतला तर 100% कारवाई होणार आणि पालिका अनधिकृत बांधकाम मुक्त होणार.
आम्ही आपले मानवाधिकार फाऊंडेशन यात सामील होणार आहोतच. तुम्हाला पण सहभागी व्हायचे असेल तर ९१३६८३२५७२ या नंबर वर व्हाट्सअँप करा.