Home ठळक बातम्या वीज ट्रान्सफॉर्मरसाठी केडीएमसीचे सुंदर मॉडेल: राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट डोंबिवलीत

वीज ट्रान्सफॉर्मरसाठी केडीएमसीचे सुंदर मॉडेल: राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट डोंबिवलीत

केडीएमसी विद्युत विभागाची अभिनव संकल्पना

कल्याण डोंबिवली दि.23 ऑक्टोबर :
रस्त्यात किंवा कोणत्याही बांधकामासाठी आता वीज ट्रान्सफॉर्मर अडथळा ठरणार नाही. केडीएमसीच्या विद्युत विभागाने यासाठी एक भन्नाट मॉडेल तयार केले असून राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट डोंबिवलीत उभारण्यात आला आहे. (KDMC’s beautiful model for electric transformers: first pilot project in the state at Dombivli)

शहराच्या सौंदर्यात पडणार भर…

रस्तारुंदीकरण असो, रस्तेबांधणी असो की आणखी कोणतेही बांधकाम. विजेचे ट्रान्सफॉर्मर नेहमीच यासाठी डोकेदुखी बनत आले आहेत. या रस्त्यातील वीज ट्रान्सफॉर्मरला मोठी जागा तर लागतेच पण त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणालाही बाधा पोहोचते. ही समस्या लक्षात घेऊन केडीएमसीच्या विद्युत विभागाने शहरातील सिंगल आणि डबल ट्रान्सफॉर्मर उभारणीसाठी तयार केलेले मॉडेल महावितरणला सादर केले होते. ज्यामध्ये नेहमीच्या उपरी वीजवाहिनीला जोडलेल्या ट्रान्सफॉर्मर उभारणीऐवजी शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या भूमिगत वीज वाहिन्याने जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरची संकल्पना मांडण्यात आली आहे.

भूमिगत वीजवाहिन्यांनी जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरची उभारणी…

तर या नव्या आधुनिक आणि देखण्या पद्धतीच्या नव्या ट्रान्सफॉर्मर उभारणीचा राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट केडीएमसी विद्युत विभागाने डोंबिवलीत यशस्वीरीत्या राबवला आहे. डोंबिवली पश्चिमेच्या सखाराम नगर परिसरात रस्ता रुंदीकरणात बाधित होणारा ट्रान्सफॉर्मर काढून त्याऐवजी नव्या पद्धतीच्या भूमिगत वीजवाहिन्यांनी जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरची उभारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे नविन ट्रान्सफॉर्मर जमिनीपासून काही फुट उंचावर बांधण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मवर बसवण्यात आले असून त्याशेजारी संरक्षक जाळीसह सुंदर अशी रंगांची सजावट करण्यात आली आहे. ज्यावर ऊर्जा बचतीसह विविध जनजागृतीपर संदेश लिहिण्यात आले आहेत. या पायलट प्रॉजेक्टच्या उभारणी कामामध्ये महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे.

राज्यातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प…

केडीएमसीचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीत उभारण्यात आलेला प्रकल्प हा राज्यातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प असून तो पूर्णपणे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या नव्या संकल्पनेमुळे शहराच्या सौंदर्यातही नक्कीच भर पडेल असा विश्वास केडीएमसी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी व्यक्त केला आहे.

त्यामुळे येत्या काळात कल्याण डोंबिवलीत विविध ठिकाणी असे नव्या संकल्पनेचे प्रकल्प झालेले आपल्याला पाहायला मिळतील यात शंका नाही.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा